Narayan Rane And Deepak Kesarkar Sarkarnama
कोकण

Ratnagiri-Sindhudurg Constituency: दीपक केसरकरांची मैत्री राणेंना विजयापर्यंत घेऊन गेली

Narayan Rane And Lok Sabha Elections winner : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत नारायण राणे यांनी जोरदार आघाडी घेत विजय मिळवला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये राणे यांना चांगलीच आघाडी मिळाली आहे.

रुपेश हिराप

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत नारायण राणे यांनी जोरदार आघाडी घेत विजय मिळवला आहे. या मतदारसंघातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये राणे यांना चांगलीच आघाडी मिळाली आहे.

त्यामुळे नारायण राणे यांच्या विजयामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने भक्कम साथ दिल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत या विजयात दिसली. स्थानिक आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा झालेली राजकीय मैत्री राणेंच्या विजयामध्ये महत्वाची ठरली.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांवर केसरकर यांची चांगली पकड आहे. त्यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही निवडणुकांमध्ये राणे आणि केसरकर एकमेकांविरोधात ठाकले होते. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आता हे दोन्ही नेते महायुतीत आहेत.

या निवडणूकीआधी (Election) केसरकर-राणे यांच्यात झालेली राजकीय मैत्री भाजपची जमेची बाजू होती. मात्र प्रचारादरम्यानही महाविकास आघाडीकडून या मैत्रीवर टीका करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून आघाडीचा प्रचार खोडून काढताना भाजपा-शिंदे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून राणे व केसरकर हे विकासात्मकदृष्ट्या एकत्र आल्याचे पटवून दिले होते. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये केसरकरांची ताकद आहेच; परंतु भाजपची संघटनात्मक बांधणीही मजबूत आहे.

या निवडणुकीत संघटनात्मक बांधणीतून भाजपाकडून पद्धतशीरपणे काम करण्यात आले होते. विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली, त्यापेक्षा अधिक पटीने प्रचार युतीकडून करण्यात आला होता. खुद्द केसरकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून राणेंचा प्रचार केला. मतदानाच्या दिवशीही केसरकर यांनी सावंतवाडीत तळ ठोकून शहरातील मतदान केंद्रांवरील आढावा घेतला होता. राणे यांच्या विजयासाठी केसरकरांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती.

सावंतवाडीमध्ये महाविकास आघाडीची झालेली शेवटची सभा काहीशी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धडकी भरवणारी होती; मात्र त्याच ठिकाणी केसरकर यांनी कुठलेही नियोजन नसताना अचानक ठेवलेली प्रचार सभा सुद्धा तितक्याच तोलामालाची ठरली होती. तिनही तालुक्यांचा विचार करता भाजप आणि शिंदेंची शिवसेना व अन्य घटक पक्षांनी एकत्रित येऊन प्रचारावर जोर दिला होता.

युवा उद्योजक तथा भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनीही स्वतंत्र प्रचार यंत्रणा हाती घेत तिन्ही तालुक्यांमध्ये मोठे पक्ष प्रवेश घेतले होते. याचच फायदाही या निवडणुकीत राणे यांना आल्याचे दिसून आले. याच मेहनतीच्या जोरावर आजचा निकाल राणेंच्या बाजूने पाहायला मिळाला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मुळातच भाजपची ताकद आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे.

भाजपकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. याच माध्यमातून त्यांनी या मतदारसंघात प्रचाराची रणनीती आखली होती. दुसरीकडे मंत्री केसरकरांनीही आपल्या पद्धतीने कार्यकर्त्यांना प्रचाराला लावले होते. त्यामुळे एकूणच या सर्व संघटित कार्याचे फळ आज राणेंना विजयाकडे घेऊन जाण्यास महत्त्वाचे ठरले. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचा विचार करता, सावंतवाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य पाहायला मिळत होते.

केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील मैत्रीनंतर मतदारसंघात केसरकर समर्थकांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे बोलले जात होते. ही नाराजी राऊतांना साथ देणार, असेही सांगण्यात येत होते; परंतु केसरकर यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानंतर ही नाराजी दूर झाल्याचे आजच्या एकूणच मतांच्या आकडेवारीवरून दिसून आलं.

सुरुवातीपासूनच सावंतवाडी तालुक्याने राणेंना मताधिक्य दिले आणि ते शेवटपर्यंत कायम राहिले. विरोधी उमेदवार विनायक राऊत यांनीही सावंतवाडीमध्ये घेतलेली मते अनपेक्षित अशीच होती. या मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. याच्या जोरावर राऊतांना या ठिकाणी चांगली मते मिळणार, अशी अपेक्षा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना होती; मात्र ती फोल ठरली. या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी यांची म्हणावी तशी ताकद नसल्याने त्याचा फटकाही राऊतांना बसल्याचे दिसून आले; मात्र संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता राऊतांनी राणेंना दिलेली टक्करही विचार करायला लावणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT