रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड १६ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
पंचायत समिती सभापती निवडणूक ९ मार्चला होणार असून २० मार्चपूर्वी पहिली बैठक घेणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यात राजकीय मोर्चेबांधणी आणि बहुमतासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
Ratnagiri News : शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार, नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक २० मार्च २०२६ पूर्वी घेणे बंधनकारक असून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवड करावे लागणार आहे. अध्यक्ष पदाची निवडणूक १६ मार्च रोजी, तर सभापती निवड ९ मार्च रोजी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून जिल्ह्याच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शासनाचे आदेश धडकताच रत्नागिरीत अध्यक्ष आणि सभापती पदासाठी आरक्षणानुसार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पंचायत समितीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये गटातटाचे राजकारण सुरू केले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. या बैठकीनंतरच जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होईल. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेच्या नियोजनासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ मार्चला होणाऱ्या या निवडीकडे आता संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंडणगडच्या अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते विलास चाळके यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. गटनेत्याची निवड २३ तारखेला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतीच शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, सदानंद चव्हाण, आमदार किरण सामंत व अन्य प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सभापतीपदांबाबत तसेच गटनेते निवडीबाबत महत्त्वपूर्ण खलबते झाल्याचे समजते.
अध्यक्षपदासाठी मंडणगड तालुक्यातील तिडे गटाच्या सदस्या अस्मिता केंद्रे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी जवळपास शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. महिला नेतृत्वाला संधी देऊन मंडणगड तालुक्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी माजी सभापती विलास चाळके यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी त्यांच्याकडे गटनेतेपदाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. उपाध्यक्षपदाची माळही त्यांच्याच गळ्यात पडण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, उपाध्यक्षांकडे आरोग्य आणि बांधकाम ही महत्त्वाची खाती असावीत असा ठराव यापूर्वीच झाला असल्याने, चाळके यांच्याकडे या महत्त्वपूर्ण समित्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
ज्या तालुक्यात मंत्री आहेत त्या तालुक्याला अध्यक्षपद द्यायचे नाही, असा प्राथमिक निर्णय झाला होता; मात्र, मंत्री आणि आमदार योगेश कदम यांनी आपल्या मतदारसंघाला अध्यक्षपदाची पहिली संधी मिळावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे मंडणगडला अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. चिपळूण आणि गुहागर या दोन्ही तालुक्यांना सभापतिपद मिळण्याचे संकेत बैठकीत मिळाले. समाजकल्याण सभापतिपद हे पद रत्नागिरी तालुक्याच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.
गटनेत्याच्या निवडणुकीनंतर घोषणा
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उदय सामंत यांचे निकटवर्ती बाबू म्हाप यांनी यावेळेस स्वतःहून कोणत्याही पदासाठी आपण उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी अडीच वर्षांनंतर जर अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले तर म्हाप यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
1. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष निवड कधी होणार आहे?
१६ मार्च २०२६ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे.
2. पंचायत समिती सभापती निवड कधी आहे?
९ मार्च रोजी सभापती आणि उपसभापती निवडणूक होणार आहे.
3. पहिली बैठक कधीपर्यंत घेणे बंधनकारक आहे?
२० मार्च २०२६ पूर्वी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक घेणे आवश्यक आहे.
4. शासनाचे निर्देश कोणी दिले?
महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी संबंधित आदेश जारी केले आहेत.
5. सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे?
आरक्षण आणि बहुमताच्या आकड्यांवरून पक्षांमध्ये गटातटाचे राजकारण तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.