

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.
आठ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडणुका ९ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जाहीर केले.
अंतिम उमेदवाराबाबत निर्णय नितेश राणे घेणार असून भाजपमध्ये अनेक दावेदार चर्चेत आहेत.
sindhudurg nitesh rane politics : सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल नऊ फेब्रुवारीला लागला. यानंतर पदाधिकारी निवड कधी होणार, याची प्रतीक्षा होती. आता हा कार्यक्रम जाहीर झाला असून २० मार्चपूर्वी पदाधिकारी निवडी घ्याव्यात, असे शासनाकडून निर्देश आले. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक १६ मार्चला तर आठही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक नऊ मार्चला होणार आहे. याबाबतचा कार्यक्रम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जाहीर केला आहे. यामुळे पदाधिकारी निवडीसाठीची चढाओढ पाहायला मिळत असून भाजपकडून संदेश उर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, प्रमोद कामत, विक्रांत सावंत यांची नावे समोर येत आहेत. पण अखेरचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे घेणार असून शेवटच्या क्षणी धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या ५० पैकी २७ भाजपचे, तर १४ शिंदे शिवसेनेचे असे ४१ सदस्य महायुतीच्या पारड्यात आहेत. महायुतीची चर्चा करताना पहिल्या काही वर्षांसाठी भाजपचा अध्यक्ष आणि त्यानंतर शिंदे शिवसेनेला संधी देण्याबाबत ठरले होते. जिल्हा परिषदेच्या सातव्या सभागृहातील ३३ वा अध्यक्ष कोण, हे १६ मार्चला स्पष्ट होणार आहे. भाजपमधून बंडखोरी करून निवडून आलेल्या सहा अपक्षांनी ठाकरे शिवसेनेच्या तीन सदस्यांसह स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे हा गट विरोधी बाकावर असेल, हे स्पष्ट आहे.
पंचायत समितीतील आरक्षण असे असेल ; वैभववाडी- सर्वसाधारण, कणकवली-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), देवगड-सर्वसाधारण, मालवण-सर्वसाधारण (महिला), कुडाळ-सर्वसाधारण, वेंगुर्ले-नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), सावंतवाडी-अनुसूचित जाती (महिला), दोडामार्ग-सर्वसाधारण (महिला).
पंचायत समिती सभापती कालावधी अडीच वर्षांचा आहे. या सभापती आरक्षित पदासाठी संबंधित सदस्य कुठल्याही गणातून निवडून आला असली तरी तो निवडणूक लढविण्यास पात्र राहील. तेच तत्त्व महिला आरक्षणासाठी लागू राहील. सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर त्याच पद्धतीने उपसभापतिपदाची निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम संबंधित सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना नोटिसीद्वारे कळविण्यात आलेला आहे. सर्व सदस्यांनी निवडी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आठही ठिकाणी महायुतीचा सभापती
महायुतीने आठही पंचायत समित्यांवर वर्चस्व राखत झेंडा फडकावला आहे. एकूण १०० पैकी तब्बल ८७ जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यामध्ये भाजपने ५८ जागांवर विजय मिळविला आहे. या निकालातूनही महायुतीचा स्पष्ट कौल दिसत असून, भाजपचे व शिवसेना महायुतीचे वर्चस्व पंचायत समित्यांवर अधोरेखित झाले आहे.
अध्यक्ष पदासाठी धक्कातंत्राची शक्यता
जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. नूतन सभागृहात काही दिग्गज नेत्यांसह नवख्या चेहऱ्यांची संख्या जास्त आहे. पद खुले असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये या पार्श्वभूमीवर खलबते सुरू झाली असून, यामध्ये धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिंदे शिवसेनेचा स्वतंत्र गट
दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची चाहूल लागताच राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी ‘शिवसेना जिल्हा परिषद पक्ष’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी केशव तथा दीपक नारकर यांची निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेना पक्षाकडून निवडून आलेले १३ सदस्य तसेच एका अपक्ष सदस्याचा पाठिंबा मिळून एकूण १४ सदस्यांचा हा गट तयार केला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र गटनेते नारकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
नव्या गटात केशव उर्फ दीपक नारकर, तुकाराम साईल, नागेश आईर, रुपेश कानडे, संतोष साटविलकर, सुधन कवठणकर, साक्षी तळेकर, यज्ञा साळगावकर, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, वर्षा सांबारी, सोनाली घाडीगावकर, अक्षता गावडे आणि रुहिता तांबे यांचा समावेश आहे. अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच गटबांधणी स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषदेत पुढील सत्तासमीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘शिवसेना जिल्हा परिषद पक्ष’च्या स्थापनेमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवड कधी होणार आहे?
१६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक होणार आहे.
2. पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी आहेत?
नऊ मार्च रोजी सभापती व उपसभापती निवड होणार आहे.
3. निवड कार्यक्रमाची घोषणा कोणी केली?
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कार्यक्रम जाहीर केला.
4. भाजपकडून कोणाची नावे चर्चेत आहेत?
संदेश उर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, प्रमोद कामत, विक्रांत सावंत यांची नावे समोर येत आहेत.
5. अंतिम निर्णय कोण घेणार आहे?
पालकमंत्री नितेश राणे अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.