Sindhudurg Gram Panchayat Political Crisis : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीतील एक असणाऱ्या साटेली-भेडशीच्या ग्रामपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्या विरोधात सरपंचांसह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाला अखेर ग्रामस्थांनीही कौल दिला. शुक्रवारी (ता. ४) झालेल्या विशेष ग्रामसभेत बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान घेण्यात आले.
यामध्ये एकूण ३८३ ग्रामस्थांनी मतदान केले. १७७ ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने, तर ७५ ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. तब्बल १३१ मते बाद ठरली. त्यामुळे अविश्वास ठरावास ग्रामस्थांची संमती मिळाल्याने उपसरपंच डिंगणेकर यांना अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले. तर या घडलेल्या घडामोडीने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत यापूर्वीच अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आजच्या विशेष ग्रामसभेतील ग्रामस्थांचा कौल हा या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरला. आजच्या विशेष सभेस तहसीलदार राहुल गुरव आणि गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासी अधिकारी तथा दोडामार्गचे सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती यशवंत गवस यांच्या अध्यक्षतेखाली सचिव तथा ग्रामपंचायत अधिकारी ज्योती डोंगरदिवे यांनी काम पाहिले. शिवाय ग्रामपंचायत परिसरात पोलिस फौजफाटादेखील उपस्थित होता.
उपसरपंच डिंगणेकर यांच्या विरोधात सरपंच छाया धर्णे यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर तहसीलदार राहुल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली २४ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली होती. या सभेत चर्चा आणि मतदानाची प्रक्रिया पार पडली. सरपंच धर्णे यांच्यासह आठ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने ठराव मंजूर झाला होता. उपसरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर होण्याची साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले होते.
दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून साटेली-भेडशी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये सातत्याने चढाओढ पाहायला मिळते. त्यामुळे उपसरपंचांविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव, त्यानंतर विशेष सभेत झालेला निर्णय आणि आता ग्रामसभेत झालेला मतदानाचा कौल यामुळे साटेली-भेडशी ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
जनतेच्या कोर्टात आम्हीच जिंकलो
सरपंच अविश्वास ठरावाला ग्रामस्थांनी दिलेल्या कौलानंतर सरपंच धर्णे यांनी ग्रामस्थांचे आणि सहकारी ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले. ग्रामस्थांनी दिलेला हा कौल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांचे आणि सहकारी सदस्यांचे आभार. पुढील गावविकासाच्या कामात नेहमीप्रमाणे ग्रामस्थांची साथ घेऊन प्रभावीपणे काम करेन. जनतेच्या न्यायालयातही आम्ही जिंकल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच छाया धर्णे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.