mumbai high court order mining ban in sawantwadi dodamarg  sarkarnama
कोकण

mining ban : मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! तळकोकणातील तब्बल २५ गावांना दिलासा

mumbai high court order mining ban in sawantwadi dodamarg 25 villages : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने मंगळवारी अंतिम अधिसूचना काढत सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील तब्बल २५ गावांना दिलासा दिला आहे.

Aslam Shanedivan

  1. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित करण्यात आली.

  2. केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.

  3. मुंबई उच्च न्यायालयालयाच्या आदेशानंतर खाणकाम आणि लाल श्रेणीतील उद्योगांवर अधिकृत निर्बंध लागू होणार आहेत.

Sindhudurg News : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील तब्बल २५ गावांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक असा निर्णय जाहीर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह एरिया’ म्हणून घोषित करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या खाणकाम प्रकल्पांना, तसेच लाल श्रेणीतील प्रदूषणकारी उद्योगांना अधिकृतपणे आळा बसणार आहे. वन शक्ती संस्थेने मुंबई उच्च न्यायालयालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयानुसार ही प्रक्रिया झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. केंद्र सरकारने मंगळवारी अंतिम अधिसूचना काढत या प्रक्रियेला शिक्कामोर्तब केले. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेला पर्यावरण संरक्षणाचा लढा यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. २०१० पासून ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी या भागातील खाणकाम व पर्यावरणीय हानीविरोधात सातत्याने पाठपुरावा केला होता. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांच्या सहकार्याने हा प्रश्न न्यायालयात नेण्यात आला.

अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारला ही अधिसूचना जारी करावी लागली. अधिसूचनेनुसार संबंधित २५ गावांमध्ये पर्यावरणाला घातक प्रकल्प किंवा कृत्यांबाबत कडक निर्बंध राहणार आहेत. यात नवीन खाणकाम प्रकल्पांना पूर्ण बंदी, लाल श्रेणीतील (उच्च प्रदूषणकारी) उद्योगांना मनाई, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड किंवा वनसंपदेचे नुकसान करणारे प्रकल्प, पर्यावरणीय संतुलन बिघडवणाऱ्या व्यावसायिक उपक्रमांवर निर्बंध आदीचा समावेश आहे. तथापि, पारंपरिक शेती, बागायती, लघुउद्योग आणि स्थानिक गरजांशी निगडित विकासकामांना आवश्यक अटींसह परवानगी दिली जाणार आहे.

राज्यस्तरीय समिती स्थापन होणार या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असतील, तर उपवनसंरक्षक सचिव म्हणून काम पाहतील. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून वर्षाच्या आत ही समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. समिती वेळोवेळी बैठका घेऊन परिसरातील प्रकल्पांचे परीक्षण करेल आणि नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवेल.

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील या गावांचा समावेश सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळबे, कोलझर, शिरवल, कुंब्रल, पणतुर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे आणि पडवे माजगाव या गावांचा इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

FAQs :

1. किती गावे इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित झाली?
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे घोषित करण्यात आली.

2. हा निर्णय कोणी जाहीर केला?
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.

3. या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार?
खाणकाम प्रकल्प आणि लाल श्रेणीतील प्रदूषणकारी उद्योगांवर निर्बंध येणार आहेत.

4. न्यायालयाची भूमिका काय होती?
मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर ही प्रक्रिया गतीमान झाली.

5. स्थानिकांसाठी हा निर्णय का महत्त्वाचा आहे?
पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि प्रदूषण नियंत्रणासाठी हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT