Shivsena-bahujan vikas aghadi Sarkarnama
कोकण

आमदार हितेंद्र ठाकूरांच्या मर्जीतील ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर : जिल्हाप्रमुखपदाची ऑफर!

अंतिम बोलणी मातोश्रीवरून होणार असून दिवाळीपूर्वी या नेत्याबरोबर त्याच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

संदीप पंडित

विरार : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने शिवसेनेने बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आपल्याकडे वळविण्यास सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचा एक ज्येष्ठ नेता आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अत्यंत विश्वासातील हा नेता सेनेच्या गळाला लागला आहे. हा नेता सेनेच्या वाटेवर असून त्याला वसई विरार जिल्हाप्रमुखपदाची लॉटरीही लागणार असल्याची चर्चा वसई विरार मध्ये रंगू लागली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांमध्ये मात्र नव्याने येणाऱ्याला थेट जिल्हाप्रमुख पद देण्याला विरोध होण्याचे संकेत मिळत आहेत. (Senior leader of Bahujan Vikas Aghadi on the path of Shiv Sena; District head post offer!)

वसई विरार महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रभागरचना करण्याचे काम सुरु झाले आहे. यातच बहुजन विकास आघाडीवर नाराज असलेल्या नेत्यांकडे शिवसेनेने आपला मोर्चा वळविला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून शिवसेनेला पालिकेत दोनअंकी आकडा कधीच गाठता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीने पालिकेवर आतापर्यंत एकहाती सत्ता राखली आहे. गेल्यावेळी तर ११५ पैकी १०८ नगरसेवक निवडून आणून बहुजन विकास आघाडीने इतिहास रचला होता.

यावेळी पालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी पंकज देशमुख या बहुजन विकास आघाडीच्या युवा कार्यकर्त्याला सेनेत प्रवेश देऊन त्याची सुरुवात केली आहे. आता तर थेट आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या खास गोटातील असलेल्या एका नेत्यालाच आपल्याकडे वळविण्यात शिवसेनेने यश मिळविले असून त्याला थेट वसई विरार जिल्हाप्रमुखपद देण्याचीही तयारी केली आहे. त्याबाबत अंतिम बोलणी मातोश्रीवरून होणार असून दिवाळीपूर्वी या नेत्याबरोबर त्याच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

बहुजन विकास आघाडीतून नेते जर शिवसेनेत येत असतील तर त्यांचे स्वागत करू. पण, पक्षनेतृत्वाने नव्याने येणाऱ्यांना थेट जिल्हाप्रमुख करू नये, अशी मागणी आत पुढे येऊ लागली आहे. यासाठी शिवसैनिक उदाहरणेही देत आहेत. गेल्या वेळी वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभेसाठी स्थानिक शिवसैनिकांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना पक्षाने बळ दिले. परंतु त्यांचा प्रभाव झाला. आता इतकी वर्षे काम करणाऱ्या शिवसैनिकांनाच पद द्यायला हवे. त्याला बळ कधी दिले जाणार की त्याने फक्त घोषणाच द्यायच्या, असा सवालही शिवसैनिक विचारू लागले आहेत.

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत कानोसा घेतला असता. आमचा फक्त एकच नेता असून तो म्हणजे स्वतः आमदार हितेंद्र ठाकूर. बाकी सर्व कार्यकर्ते आहेत, त्यामुळे जो तो कार्यकर्ता असेल. आमच्याच नेत्याने त्याला शिवसेनेत पाठविण्याची खेळी केली असावी. ज्यामुळे शिवसेनेतील निवडणुकीची रणनीती आम्हाला समजू शकेल, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत वसई विरारमधील राजकीय वातावरण तापणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT