मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी न्यायालयाकडून तातडीने दिलासा मिळू शकलेला नाही. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उद्यावर (ता.29) ढकलली आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.
नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर आज न्यायालयात साडेतीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता.29) सुनावणी होईल, असे जाहीर केले.
नितेश राणे यांच्या वतीने अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली केला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील घरत म्हणाले की, अटकपूर्व जामीन अर्जावर अर्जदाराच्या वकिलाने युक्तिवाद केला आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना आम्ही उत्तर दिले आहे. आमचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकलेला नाही. उद्या ऊर्वरीत युक्तिवाद पूर्ण करण्यात येईल. अंतरीम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.
काय आहे प्रकरण?
संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि करंजे गावचे माजी सरपंच आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले. परब यांनी आपल्यावरील हल्ल्याला नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर या हल्ल्याच्या तपासाची मागणी शिवसेनेने लावून धरली. तसेच या प्रकरणाला राजकीय शत्रुत्वाच्या संशयावरून नितेश राणे यांच्यासह आणखी काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना पकडण्याच यश आले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. . सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.