Sharad Pawar-Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Konkan Politics : तटकरेंविरोधात शरद पवारांची विशेष रणनीती; पनवेलच्या सभेत घेणार समाचार

Ajit Pawar Vs sharad Pawar Group : अजित पवार यांच्या बंडामागे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असल्याची ठाम धारणा शरद पवार गटाची आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शरद पवार यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने रायगड लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथे येत्या १० डिसेंबर रोजी पवारांची जाहीर सभा होणार आहे. तटकरेंना कोणत्याही परिस्थितीत रायगडमध्ये रोखण्यासाठी शरद पवार गटाकडून पावले टाकली जात आहेत. (Sharad Pawar's meeting in Sunil Tatkare's constituency on December 10)

अजित पवार यांच्या बंडामागे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असल्याची ठाम धारणा शरद पवार गटाची आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तटकरे यांनी अजित पवार यांनी बाजू खंबीरपणे लावून धरली आहे. शरद पवार गटाकडून होणारे प्रत्येक हल्ले तटकरे एकहाती परतवून लावत आहेत. त्यामुळेच ते पवार गटाच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खुद्द शरद पवार यांनीही तटकरे यांना रायगड रोखण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. त्यातून त्यांनी काही दिवसांपूर्वी तटकरे यांचे बंधू, माजी आमदार अनिल तटकरे यांच्याशी गुफ्तगू केले होते. त्याचवेळी अनिल तटकरे शरद पवार गटात सामील होतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, माजी आमदार तटकरे यांचा प्रवेश अजून तरी झालेला नाही. मात्र, सुनील तटकरे यांच्या विरोधात पवारांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथे येत्या १० डिसेंबर रोजी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच तटकरे यांच्या भूमिकेवरही प्रहार करतील, असे मानले जात आहे. कारण तटकरे यांना पक्षाने सर्वकाही दिले होते.

विशेषतः तटकरे यांना मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद, खासदारकी, मुलाला आमदारकीचे तिकीट, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद, मुलाला विधान परिषदेची आमदारकी एवढं सगळं तटकरे यांच्या कुटुंबीयांमध्ये देण्यात आले होते. त्यानंतरही ते पवारांविरोधात विशेषतः सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्रमक धोरण घेताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी पवारांनी शेकापचे जयंत पाटील यांच्या रायगड जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य केले नव्हते. मात्र, जयंत पाटील यांनी आम्ही तटकरे यांना मदत केली, ही चूक झाली, अशी जाहीर कबुली भाषणात दिली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पवार हे ठाकरेंची शिवसेना, शेकाप आणि काँग्रेस यांच्या मदतीतून तटकरेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT