Kokan MLC Election 2026 : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेची पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आपल्या पुत्रासाठी फिल्डिंग लावत असून मंत्री भरत गोगावले देखील आपल्या मुलासाठी आग्रही दिसत आहेत. अशातच येथे शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) अचानक एन्ट्री झाल्याने येथे ट्विस्ट निर्माण झाला आहे. शेकापने अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी देत या निवडणुकीचे राजकीय समीकरण अधिकच रंजक बनवले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकींच्या घोषणा झाली असून कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेचीत पाहायला मिळत आहे. एका जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दावा केल्याने महायुतीत पेच वाढला आहे. दरम्यान येथे राष्ट्रवादीने सीक्रेट गेम खेळत गोगावलेंना शांत केल्याची चर्चा आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री पद गोगावलेंना देत विधान परिषदेची जागा पदरात पाडून घेतल्याचे बोलले जात आहे. एकीकडे या चर्चांमुळे माजी आमदार अनिकेट तटकरे यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. तोच गोगावले यांनी अशी कोणतीच डील झाली नसल्याचे म्हणत राजकीय बाँम्ब फोडला आहे. यामुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून महायुतीत पेच कायम आहे.
अशातच शेतकरी कामगार पक्षाने थेट येथे उमेदवार देत महायुतीचे टेन्शन वाढले आहे. येथे माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच पनवेल महापालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. अलिबाग येथील शेकापच्या शेतकरी भवनात पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. म्हात्रे सोमवारी (ता. १) रत्नागिरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
धक्कादायक म्हणजे विधान परिषदेच्या या जागेसाठी शेकाप पहिल्यांदाच अधिकृत उमेदवार देत असून ही खेळी शेकापच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाची आहे. तर यातूनच शेकाप कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा विचार केल्यास येथे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत तब्बल १०२१ मतदार आहेत. हे मतदार महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती आहेत. या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो.
फक्त रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात एकूण मतदार ५१८ आहेत. ज्यात शेतकरी कामगार पक्षाचे अवघे ४३ सदस्य आहेत. पण येथे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची मदत शेकापला होऊ शकते अशीही चर्चा आहे. यामुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
अरविंद म्हात्रे यांच्यावर विश्वास का?
अरविंद म्हात्रे माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष असून ते सध्या पनवेल महापालिकेत विद्यमान विरोधी पक्षनेते देखील आहेत. त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांतील संपर्क दांडगा आहे. यामुळेच त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान म्हात्रे यांनी एका विधानाने चर्चांना धुरळा उडवून दिला आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी, आपल्या मागे दाढीवाल्या बाबाची अदृश्य शक्ती असल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या या मिश्किल विधानानंतर आता जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात तो दाढीवाले बाबा नेमके कोण? अशी चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.