Sunil Tatkare sarkarnama
कोकण

उद्धव ठाकरे-अजितदादांना अभिप्रेत असलेली आघाडी दापोलीत यशस्वी

दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे.

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ (जि. रत्नागिरी) : दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे. दापोलीकरांनीही भरघोस मते देऊन आम्हाला चांगली साथ दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना अभिप्रेत असलेली आघाडी दापोलीत यशस्वी ठरली आहे. दापोलीकरांना अभिप्रेत असलेला विकास करण्यासाठी आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहू. निवडणुकीमध्ये दापोलीकरांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करून पर्यटनदृष्ट्या दापोलीचा विकास करू, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली. (Shiv Sena, NCP alliance formula successful in Dapoli : Sunil Tatkare)

माजी आमदार संजय कदम म्हणाले, दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन लढवलेली निवडणूक व त्यातील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय असून अपक्षांना मतदारांनी नाकारले. दापोलीकरांना अभिप्रेत असलेले विकासकामे यापुढील काळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून करण्यात येतील.

दरम्यान, पक्षापेक्षा कोणी मोठे नाही, शिवसेना या चार अक्षरांमुळे स्वतःची ओळख असल्याचे काहीजण विसरले होते. मात्र, दापोली नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाने त्यांचा भ्रम दूर केला आहे, अशा शब्दांत या आघाडीला विरोध दर्शविणारे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी टोला लगावला आहे.

दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या विजयानंतर माजी आमदार दळवी बोलत होते. ते म्हणाले की, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी व्हावी, अशी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी आदेश दिले. मात्र, माझ्यापेक्षा या मतदार संघात कोणी मोठा नाही, असा भ्रम अनेकांना झाला होता. त्यांचा तो भ्रम येथील मतदारांनी दूर केला आहे. अजूनही वेळ गेली नाही. पक्षामध्ये योग्य पद्धतीने कार्यरत व्हा, असा संदेश आपण सर्वांना या निमित्ताने देऊ इच्छितो, असेही त्यांनी सांगितले.

दळवी म्हणाले की, दापोलीकरांच्या विकासात आपण कधीही कमी पडलो नाही. नगरपंचायतीची स्थापना ही आपल्या पुढाकाराने झाली होती, त्यामुळे विकासकामे व दापोलीचे स्वच्छ आणि सुंदरतेचे स्वप्न यापुढील काळात निश्‍चितच पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ‘‘आगामी काळात दापोली तालुक्याचा दौरा आपण करणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका याच ताकदीने लढवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे,’’ असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT