Kokan MLC Election News : राज्यातील १७ विधान परिषद आणि एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणूक अशा १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान कोकणातील जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता होती. येथे शिवसेनेनं दावा करत आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्या समोर आव्हान निर्माण झाले होते. पण आता उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कान टोचल्यानंतर दळवी यांनी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषदेच्या जागेची उमेदवारी घोषित होण्याच्या आधीच महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. येथे अनिकेत तटकरे यांना उमेदावरी मिळण्याची दाट शक्यता असताना मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी दंड थोपाटले होते. पण त्यांनी अर्ज दाखल करण्याबाबत भूमिका घेतली नव्हती. मात्र अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांना आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला होता.
यावेळी जुईली दळवी यांनी राष्ट्रवादीसह खासदार तटकरे यांच्यावर आरोप करत आपण अर्ज माघार घेणार नाही असे म्हटले होते. तसेच आमदार दळवी यांनी देखील तटकरेंवर गंभीर आरोप करत पालकमंत्री पदावर शिवसेनेचा दावा सांगितला होता. ज्यानंतर कोकणाच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. अशा राजकीय वादंगातच अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यानंतर कोकणातील जागा जिंकण्यासाठी महायुतीत कुठलेही वाद होऊ नयेत, यासाठी मंगळवारी २ जून रोजी मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात मुंबईत 'एक्सप्रेस टॉवर मध्ये कोकणातील शिंदे शिवसेनेचे आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोकणात महायुतीमधून अनिकेत तटकरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.
महायुतीचा नियम पाळला पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. यानंतर नेत्याचा आदेश पाळण्याची तयारी या नाराज आमदारांनी दाखविल्याचे समजते. शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार आता जुईली दळवी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींच्या संख्याबळाच्या दृष्टीने कोकणात शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही जागा आपल्या वाट्याला यावी, यासाठी शिवसेनेचे कोकणातील आमदार आग्रही होते. मात्र महायुतीतील जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आहे. त्यातच आता जुईली दळवी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला असून महाविकास आघाडीचे आव्हान समोर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.