uddhav thackeray And Uday Samant sarkarnama
कोकण

Uday Samant : सामंतांना ठाकरेंचा शिलेदार भिडला, सीडीआर आणि सीसीटीव्ही तपासा म्हणत दिले खुले आव्हान

Political dispute between Uday Samant and Bal Mane : बेईमानीचे बाळकडू उदय सामंत यांना मिळाले आहे. ते आमच्याकडे नाही. आपण भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून पक्ष सोडला अन् मातोश्रीवर शिवबंधन बांधले. ते ही लाईफटाईमसाठी.

Aslam Shanedivan

  1. पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करत गौप्यस्फोट केला होता.

  2. बाळ माने यांनी हा दावा फेटाळत थेट आव्हान दिले असून, ठाकरेंच्या शिवसेनेशी आपली निष्ठा जाहीर केली.

  3. या आरोप-प्रत्यारोपामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी आमदार बाळ माने भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर आता स्थानिकच्या तोंडावर कोकणासह ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे. तर उदय सामंत विरूद्ध बाळ माने असा राजकीय वाद सुरू झाला आहे.

सामंत यांनी बाळ माने भाजपच्या वाटेवर असून ते भाजपमध्ये जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. यासाठी माझी अडचण ठरू नये म्हणून मला मध्यस्थी करायला सांगत असल्याचेही ते म्हणाले होते. यावरून आता वार-पलटवार सुरू झाले असून बाळ माने यांनी देखील सामंत यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी सामंत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून माझा सीडीआर तपासावा, कोणतेही भाजप कार्यालय किंवा पदाधिकाऱ्यांचे सीसीटीव्ही तपासावेत. त्यामध्ये मी गेल्याचे सिद्ध झाले तर तत्काळ राजकारणातून मी निवृत्ती घेईन. तर सामंत ज्या ग्रामदैवत भैरी देवाला मानतात त्याची त्यांनी शपथ घ्यावी आणि सांगावे की ते आजन्म एकनाथ शिंदेंबरोबर राहतील. भाजपमध्ये जाणार नाहीत.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेवून माने यांनी सामंतांवर जोरदार निशाना साधला आहे. यावेळी माने म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोडून मी भाजपत जाण्याचा आता प्रश्नच नाही. यामुळे पालकमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी विषयांतर करू नये. रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज व आरोग्यव्यवस्था, इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांसंदर्भातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. माझे काढू नये.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजपमध्ये आमच्या कुटुंबाची 64 वर्षे गेली आहेत. माझ्या तत्त्वांना न्याय मिळत नसल्याचे दिसल्यानंतर मी भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगून भाजप सोडली. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता भाजप आयाराम वाल्यांमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे तेथे जाण्याची गरज नाही.

पण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय्य सहाय्यकांच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत देखील मी प्रयत्न करत असल्याचे ते आता म्हणत आहेत. त्यांच्या या म्हणण्यानुसार आपण किंचितसा जरी विश्वास ठेवला तर लोकांना यात तथ्य दिसणार नाही. कारण कोणाचा स्वीयसहायक पक्ष चालवत नाही, हे लोकांना चांगलच माहित आहे.

उलट जनतेने पालकमंत्र्याऐवजी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठीच माझा प्रयत्न सुरू आहे. जो पुढेही राहणार आहे. रत्नागिरीत एका सिंघमची गरज होती आणि तो ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिला आहे. आता दिवाळी आटपली असून, थोडेफार फटाके शिल्लक आहेत. ते आता वाजवायची वेळ आली आहे.

लाईफटाईम शिवबंधन बांधले

बेइमानीचे बाळकडू हे बाळ मानेंना मिळालेले नाही. वर्षांपूर्वी मी मातोश्रीवर लाईफटाईम शिवबंधन बांधले आहे. अर्धी फ्रॅंकी खाऊन सुरतमार्गे गुवाहाटीला जाणारा बेइमान बाळ माने नाही, असाही पलटवार बाळ माने यांनी केला आहे.

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मिंधे गुवाहाटीला गेले असताना शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते फ्रॅंकी खात होते. अर्धी फ्रॅंकी खाऊन ते ईडीच्या भीतीने पळाले. मात्र मी 40 वर्षे भाजपचे काम करून जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला नाही की पळून जावून अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

उदय सामंतचा लखोबा लोखंडे

‘तो मी नव्हेच’ हे एक गाजलेलं नाटक असून यातील लखोबा लोखंडे हे एक पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. पण आता याच लखोबा लोखंडे पेक्षाही अधिक अभिनय उदय सामंत करत आहेत, असाही टोला उपनेते बाळ माने यांनी लगावला.

FAQs :

1. उदय सामंत यांनी काय गौप्यस्फोट केला?
सामंत यांनी बाळ माने हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता.

2. बाळ माने यांनी काय उत्तर दिलं?
माने यांनी हा दावा खोटा ठरवून आपला सीडीआर आणि सीसीटीव्ही तपासण्याचं आव्हान दिलं आहे.

3. बाळ माने कोणत्या गटाशी संलग्न आहेत?
ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संलग्न आहेत.

4. भैरी देवाचा उल्लेख का झाला?
बाळ माने यांनी सांगितले की सामंत यांनी आपल्या ग्रामदैवत भैरी देवाची शपथ घेऊन सांगावे की ते भाजपमध्ये जाणार नाहीत.

5. या वादाचा परिणाम काय झाला आहे?
या प्रकरणामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गट आणि सामंत समर्थकांमध्ये तणाव वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT