Duplicate Voter Issue uddhav thackeray 
कोकण

Duplicate Voter Issue : पालिका निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापले? मतदार यादीत धक्कादायक माहिती उघड, ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ratnagiri Municipal elections : आगामी रत्नागिरी पालिका निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबार मतदारांच्या आकड्यामुळे खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची नावे दुबार आढळल्याने वाद निर्माण झाला आहे.

  2. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या प्रकरणात निवडणूक विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  3. शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी दुबार नावे वगळण्याची मागणी करत मुख्याधिकाऱ्यांकडे औपचारिक आक्षेप नोंदवला आहे.

Ratnagiri News : राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जवळ आल्याने आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार याद्यांबाबत घोळ असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच हा घोळ सपवल्यानंतरच निवडणूका घ्याव्यात अशी मागणी केली. यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा तापण्यास सुरूवात झाली आहे. याचदरम्यान रत्नागिरीत दुबार मतदारांच्या आकड्यामुळे खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी अक्षेप मुख्याधिकाऱ्यांकडे नोंदवला आहे. त्यांनी निवडणूक विभागाने याबाबत दिलेली मुदत वाढवून सदोष यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी केला आहे.

आगामी रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. सध्या पालिकेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून यामध्ये एकूण 64 हजार 768 मतदारांपैकी 1 हजार 32 एवढी मतदारांची नावे दुबार आढळली आहेत. ग्रामीण भागातील मतदारदेखील शहरी भागात लागल्याचे समोर आले आहे. त्याची दुरुस्ती करावी, मयत मतदारांची नावे वगळावीत, अशी तक्रार निवडणूक विभाग आणि आयोगाकडे केली आहे.

बाळ माने याआधी देखील पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 23 हजार मतदारांची बोगस नावे असल्याचा दावा केला होता. त्याबाबत त्यांनी यादीची झेरॉक्स काढून ती निवडणूक विभागाला सादर केली होती. ज्याच्यावर अद्याप आयोगाने कोणतीच कारवाई केलेली नाही. तोच आता पुन्हा रत्नागिरी शहराच्या मतदार यादीत एख हजारहून अधिक दुबार मतदार सापडल्याने त्यांनी पुन्हा आक्षेप नोंदवला आहे.

याबाबत ते म्हणाले की, शहराची प्रारूप यादीची तपासणी केली तेव्हा लक्षात आले की, 64 हजार 768 मतदारांपैकी 1 हजार 32 मतदारांची नावे दुबार आहेत. ही नावे एका ठिकाणी करावीत. 33 हजार 915 मतदार असे आहेत की, ते जिथे राहतात तिथे त्यांचे मतदान नसून दुसऱ्या ठिकाणी आहे.

त्यामुळे मतदानादिवशी नेमके केंद्र कुठे आहे, याचा गोंधळ होतो. ते ज्या केंद्रावर जातात तिथे त्यांचे यादीत नाव नसते. त्यामुळे जिथे वास्तव्य आहे तिथे त्यांची नावे असावीत. यासाठी फॉर्म बी भरून द्यावा लागणार म्हणून निवडणूक आयोगाने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच यादीमधील मयतांची नावे अजून वगळण्यात आलेली नाहीत, तीही वगळण्यात यावीत, असेही त्यांनी म्हटलं आहे.

अंतिम यादी प्रसिद्ध करू नये

ग्रामीण भागातील अनेक मतदारांची नावे शहरात आहेत. त्यामध्येही दुरूस्ती करावी. पालिका निवडणुकीला सामोरे जाताना जोवर मतदार यादी सदोष होत नाही तोवर अंतिम यादी प्रसिद्ध करू नये, अशी मागणी केल्याचे बाळ माने यांनी सांगितलं आहे.

FAQs :

1. रत्नागिरी पालिकेच्या मतदार यादीत नेमकी समस्या काय आहे?
प्रारूप यादीत 1,032 मतदारांची नावे दुबार नोंद झाल्याचे आढळले आहे.

2. या प्रकरणात शिवसेनेची भूमिका काय आहे?
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने या त्रुटीविरोधात आक्रमक भूमिका घेत औपचारिक आक्षेप नोंदवला आहे.

3. बाळ माने यांनी काय पावले उचलली आहेत?
बाळ माने यांनी निवडणूक विभागाकडे दुबार नावे वगळण्याची मागणी करून तक्रार दिली आहे.

4. एकूण किती मतदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे?
एकूण 64,768 मतदारांची यादी प्रसिद्ध झाली असून त्यापैकी 1,032 नावे दुबार आहेत.

5. या घटनेचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मतदार यादीतील त्रुटीमुळे निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT