रामदास कदम यांनी अनिल परब आणि संजय कदम यांनी झोपडीधारकांना फसवल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना प्रत्युत्तर देत संजय कदम यांनी रामदास कदमांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
या घटनेमुळे शिवसेनेत तणाव निर्माण झाला असून कोकणातील राजकारण तापले आहे.
Ratnagiri News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तळकोकणातील नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काय घडले असा सवाल करत त्यांच्या हाताचे ठशांच्या उल्लेख करत धक्कादायक आरोप केले होते. ज्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार पलटवार करत त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. पण त्यांनी अद्याप तो केलेला नाही. पण दुसऱ्याच एका नेत्याने रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटलं आहे. कदम यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत दावा केला होता. याचप्रकरणी ठाकरेंच्या शिलेदाराकडून मानहानीचा खटला दाखल करण्यात येणार आहे. यामुळे कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना विरूद्ध शिवसेना असा कलगितूरा रंगला असतानाच रामदास कदम यांनी धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांचे हातांचे ठसे उद्धव ठाकरेंनी कशासाठी घेतले असा सवाल करत गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर वाद उफाळला होता.
हा वाद थांबत असतानाच मंत्री योगेश कदम यांचे नाव सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरणात समोर आले आणि त्यांचा पाय खोलात जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली. यावेळी रामदास कदम यांनी दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र अनिल परब यांनी केलेल्या मागणी प्रमाणे अद्याप माफी मागितलेली नाही. यामुळे त्यांच्यांवर अब्रूनुकसानीच्या दाव्याची टांगती तलवार अजूनही आहे. परब यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
एकीकडे परब अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या तयारीत असनाच शिवसेनेचे स्थानिक नेते संजय कदम यांनी त्यांना अडचणीत आणण्याचे ठरवले आहे. कदम यांनी, अनिल परब आणि संजय कदम यांनी झोपडीधारकांना फसवले असा आरोप केला होता. जो खोडून काढत संजय कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मागील 15-20 वर्षांपासून आम्ही विभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. 2016 ते 2019 दरम्यान झोपडीधारकांना भाडं दिलं होतं. त्यानंतर DHFL ने या प्रकल्पाला लोन दिलं, मात्र कंपनीच्या अडचणींमुळे प्रक्रिया अडकली. हायकोर्टाने आम्हाला थकीत भाडं देण्याचे आदेश दिले असून लवकरच ते मिळणार असल्याचेही स्पष्टीकरण संजय कदम यांनी दिले आहे.
तसेच रामदास कदम यांच्या आरोपावर बोलताना, आम्ही दोन वर्षांचे भाडं दिलं असून ज्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. रामदास कदम यांनी केलेला 8 हजार झोपडीधारकांचा आकडा खोटा आहे, काही लोकांनी भाडं घेऊन स्वेच्छेने जागा सोडली आहे. लॉकडाऊन काळात आम्ही 250 जणांची राहण्याची सोय केली होती, असाही त्यांनी खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
परब यांनी योगेश कदम यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली होती. तसेच गंभीर आरोप केले होते. त्यांनी याच्याआधी वाळू आणि सावली बार प्रकरणी आपण विधीनंडळात, विधान परिषदेत आवाज उठवला आहे. योगेश कदम यांच्याविरोधात सबळ पुरावेही मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. पण अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. आतातर योगेश कदम यांनी गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन कदमांची सरकारमधून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती.
यावर पलटवार करताना रामदास कदम यांनी, परब आपला केबलचा व्यवसाय असल्याचे सांगत असतात, पण त्यांनी किती बोगस कंपन्या काढल्या हे देखील सांगाव. वडील, भाऊ, पत्नी, मुलगी यांच्या नावे त्या काढल्या असून आम्हाला बदनाम करण्यासाठी ते ठाकरेंच्या सांगण्यावरुन बोलत आहेत, असा दावा केला होता. तसेच त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून मागील काही वर्षापासून माझा मुलगा योगेश कदम यांना टार्गेट केलं जातंय. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. उद्धव ठाकरे यांना भेटून परबांनी योगेश कदमांची तक्रारही केली. पण आता योगेश कदम मंत्री झाल्याने परब यांना पोटशूळ उठल्याचा घणाघाती आरोप देखील रामदास कदम यांनी केला होता.
प्र.1: रामदास कदमांनी कोणता आरोप केला होता?
👉 त्यांनी अनिल परब आणि संजय कदम यांनी झोपडीधारकांना फसवल्याचा आरोप केला.
प्र.2: संजय कदमांनी काय प्रतिक्रिया दिली?
👉 त्यांनी हा आरोप फेटाळत रामदास कदमांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली.
प्र.3: हे प्रकरण कोणत्या ठिकाणचे आहे?
👉 हे प्रकरण तळकोकणातील शिवसेना नेत्यांमध्ये उफाळले आहे.
प्र.4: या प्रकरणात अनिल परब यांचा काय संदर्भ आहे?
👉 रामदास कदम यांनी त्यांच्या नावाचाही उल्लेख करत फसवणुकीचा आरोप केला होता.
प्र.5: या वादाचा शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.