Nilesh Rane, Bhaskar Jadhav  Sarkarnama
कोकण

Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav : भास्कर जाधव - राणे वाद चिघळला; चिपळूणमध्ये ताफ्यावर दगडफेक

Sunil Balasaheb Dhumal

Sindhudurg Political News : गुहागर येथील सभेसाठी नीलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा चिपळूण येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे चिपळूण शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे.

भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्या जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी गुहागरमध्ये करण्यात आले होते. त्या सभेसाठी मुंबईहून आलेल्या नीलेश राणेंच्या ताफ्यावर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. दरम्यान, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव (Bhaskarrao Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर चिडलेले माजी खासदार नीलेश राणेंनी भास्कर जाधवांना हिशोब चुकता करणार, असा इशारा दिला होता. त्यानुसार राणेंची आज गुहागर येथे जाहीर सभा होणार होती. दरम्यान, सभास्थळी जाणाऱ्या नीलेश राणेंच्या ताफ्यावर चिपळूण येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. परिणामी ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा झाला. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ नीलेश राणे यांच्या गाड्यांवर फेकण्यात आलेल्या दगडांचा मोठा साठा पाहायला मिळाला. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त चिपळूण शहरात मुंबई-गोवा महामार्ग परिसरात तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच गुहागर शृंगारतळी येथे नीलेश राणे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी नीलेश राणे चिपळूणकडून गुहागरच्या (Guhagar) दिशेने निघाले असताना हा सगळा प्रकार घडला आहे. आता नीलेश राणे सभेत काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT