Mumbai : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. यानंतर राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या सरकारला सव्वा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
मात्र, हे सरकार कोसळणार असल्याच्या वल्गना सातत्याने ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून केल्या जातात. सरकार तर कोसळलं नाही उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे ते आणखी भक्कम झालं. मात्र, आता ठाकरे गटाच्या नेत्यानं मोठा खळबळजनक दावा केला आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्करराव जाधव(Bhaskarrao Jadhav) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांनी या कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. जाधव म्हणाले, ही लढाई आपली, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहा महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधव या भागात, जिल्ह्यात आणि राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेन, असं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आजपर्यंत जशी साथ दिली, तशीच साथ द्यावी, असंही आवाहन त्यांनी लोकांना केलं.
" ...तर भाजपचे सहा ते सात खासदार निवडून येणार!"
भास्कर जाधव यांनी या कार्यक्रमात मुंबई महापालिकेतील सर्व्हेवरूनहीदेखील भाजपसह शिंदे गटाला फटकारलं. ते म्हणाले, शिवसेना फोडल्यानंतर भाजपनं सहा ते सात सर्व्हे केले. त्या सगळ्या सर्व्हेत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचे(Uddhav Thackeray) सगळे नगरसेवक निवडून येतील, असा कौल समोर आला आहे.
तर दुसरीकडे भाजपचे फक्त २८ नगरसेवक निवडून येतील असं समोर आलं आहे. भाजपचे शिवसेना(Shivsena) धरून ४१ खासदार आहेत. पण उद्या निवडणूक झाली, तर भाजपचे सहा ते सात खासदार येतील, असा अहवाल आल्याचेही जाधव यांनी या वेळी सांगितले.
'' सगळे जण माझ्याविरोधात तुटून पडणार...''
भास्कर जाधव म्हणाले, दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांकडून राजकारणाचा स्तर खाली घसरवण्याचं काम देशपातळीवर सुरू आहे. मी जिथे उभा राहील, त्या ठिकाणी सगळे जण माझ्याविरोधात तुटून पडणार आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात कुणीतरी लढलं पाहिजे. कोकणातल्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे, हे लक्षात ठेवा, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
" ते बारामतीमधूनदेखील निवडणूक लढवतील...!"
उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांना काही दिवसांपूर्वी खोचक टोला लगावला होता. ते म्हणाले, आमदार जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधूनदेखील निवडणूक लढवतील. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. भाषण काय मीही करतो, त्यामुळे बोलायला काय जाते? प्रत्यक्षात जनता ठरवते, कोणाला विजयी करायचे ते. लोकशाहीत ज्यांच्या नशिबात असते तोच विजयी होतो, असा चिमटाही त्यांनी काढला.
सामंत म्हणाले, ते कुठून निवडणूक लढवतील हे तेच ठरवतील. आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. आमदार जाधवांनी बारामती, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांचा तो अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.