Ratanagiri News : कोकणात नारायण राणे व आमदार भास्कर जाधव यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग येथील सभेत नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाधव यांच्यावरती तोफ डागली होती. आता जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शुक्रवारी माजी खासदार नीलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा होत आहे.
भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मॅसेज आले आहेत. त्याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या कार्यालय आणि घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील बहादूर शेख नाक्यात टायगर इज कमिंग चुकीला माफी नाही, अशा आशयाचा माजी खासदार नीलेश राणे यांचा बॅनर लागला असून, त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे नीलेश राणे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या गुहागर येथील सभेकडे अवघ्या कोकणाचे लक्ष लागले आहे.
भास्कर जाधव व नीलेश राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. नीलेश राणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर भास्कर जाधव यांच्या विरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोटे येथे नुकताच राणेंचा दौरा झाला. त्यावेळीही त्यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोकण दौऱ्यात सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभांना आमदार जाधव यांनी हजेरी लावली आणि राणे कुटुंबीयांवर टीका केली. त्यानंतर राणे आणि जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भास्कर जाधव यांच्या विरोधात राणे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
जाधव यांनी सिंधुदुर्गात जाऊन राणेंवर टीका केली, त्याची परतफेड नीलेश राणे (Nilesh Rane) हे भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात जाऊन करणार आहेत. राणेंकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भास्कर जाधव मंत्री असताना त्यांचे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले कार्यालय राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोडले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये होणाऱ्या राणेंच्या सभेसाठी चिपळूण आणि गुहागरमध्ये पोलिस बंदोबस्त असणार आहे.
शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याबरोबर दोन पोलिस कर्मचारी असतात. त्याशिवाय त्यांच्या घराकडे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. चिपळूण आणि गुहागरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर आमचे लक्ष असेल, अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने (चिपळूण) यांनी दिली आहे.
(Edited by- Sachin Waghmare)
R