Palghar Political News : पालघर जिल्ह्याच्या राजकारणात शिंदेंच्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपनेच धक्का दिला असून, माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पालघर दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यादरम्यान माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी हबीब शेख यांच्यासह सरपंच आणि सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे, याआधीच शिवसेनेचे काही पदाधिकारी रुग्णालयातील राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातच आता श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिवसेनेचे बळ कमी होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे, जव्हार भागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. येथील माजी आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वालाही धक्का बसला आहे. भुसारा यांच्या जाचाला कंटाळून हबीब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केल्याची चर्चा आहे.
अशातच आता माजी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर श्रीनिवास वनगा यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राहिले.
मात्र, निवडणुकीच्या काळातही त्यांच्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत मतभेद समोर आले होते. त्यांनी बंडखोरीची भूमिकाही घेतली होती. त्यानंतर ते पक्षाच्या घडामोडींपासून काहीसे दूर असल्याचे दिसून आले. गेल्या काही काळापासून वनगा यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पालघरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः शिंदे गटासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता श्रीनिवास वनगा यांना भाजपमध्ये कोणती जबाबदारी मिळणार आणि त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील इतर पक्षांच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात पालघरच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.