Sindhudurg 900 Crore Land Deal Controversy News : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सिंधूदुर्गातील शेत जमिनींच्या संदर्भात मोठा दावा करत गौप्यस्फोट केला. त्यांनी सिंधूदुर्गातील 900 कोटीची शेत जमीन ही बड्या धनिकांना बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर या व्यवहारात मंत्रिमंडळातील कोकणातले नेते त्यांचे पार्टनर असल्याचा आरोप केला आहे.
या आरोपानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले असून याआरोपावर भाजप नेते तथा सिंधूदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राऊतांवर बोचरी टीका करत त्यांना तोंड काळं करण्यासाठी कुठेना कुठे शोधावे लागेल, असा पलटवार केला आहे.
संजय राऊत यांनी, सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यातील 900 कोटींची शेत जमीन ही बेकायदेशीर मार्गाने विकण्यात आली आहे. ही जमीन बंगळुरु, दिल्ली आणि हैदराबाद मधल्या धन-दांडग्यांच्या घशात घातली जात आहे. जे शेतकरी नाहीत त्यांना या जमीन विकण्यात आल्या आहेत.
मात्र एकीकडे महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा असताना शेत जमीन विकता येत नसताना महसूल खाते संपूर्ण व्यवहाराची गेल्या तीन वर्षांपासून चौकशी करत असतानाही असे व्यवहार सुरू आहेत. या तीन तालुक्यातली जमीन विकायला काढल्या जात आहेत. यामुळे येथील जमिनींचा ताबा बाहेरचे लोक घेताना दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
या सर्व व्यवहारात आपल्या मंत्रिमंडळातला कोणता महान हिंदुत्ववादी मंत्री सहभागी आहे. तो या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याची दलाली करतोय. इस्टेट एजंट बनून काम करत असून त्याला किती कोटींची दलाली मिळाली? याची माहिती आता आम्हाला राज्याचे मुख्यमंत्र्यांकडूनच ऐकायचंय, असेही राऊत यांनी म्हटले होते.
दरम्यान या आरोपावरून राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून राऊतांच्या या आरोपांना भाजपने उत्तर दिले आहे. मंत्री नितीश राणे हे सर्व आरोप फेटाळले असून राऊत यांच्यावर जिव्हारी टीका केली आहे. त्यांनी, याबाबत सध्या विभागीय आयुक्तांच्या मार्फत चौकशी केली जात आहे. याबाबत कोकण आयुक्त हिवाळी अधिवेशनात अहवाल सभागृहाला देतील यानंतर मात्र संजय राजाराम राऊत यांनी तोंड काळं करत फिरू नये. कारण त्यांना तोंडावर आपटण्याची फार जुनी सवय आहे.
राऊत हे असेच वेड्या सारखे आरोप करतात. सध्या या प्रकरणात चौकशी सुरू आहे. तर जे काही समोर येईल ते सभागृहात पटलावर ठेवलं जाईल. आणि जर यात कोकणातील कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षाच होणार. मग तो कोणाचा किंवा कोणीही असू दे. आम्हाला त्याची भीती नाही. कारण कोणीच काहीच चुकीचं केलेलं नाही. फक्त अहवाल येऊ द्या. मग त्या दिवशी आम्हाला संजय राऊतांना तोंड काळं करण्यासाठी कुठेना कुठे शोधावे लागेल, अशी टीका मंत्री नितीश राणे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.