सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल करून मोठा राजकीय डाव खेळला आहे.
या खेळीमुळे त्यांची मुलगी आदिती तटकरे आणि मुलगा अनिकेत तटकरे यांची आगामी आमदारकी सुरक्षित झाल्याची चर्चा आहे.
शिवसेनेला रायगडमध्ये मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून तटकरे गट अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Raigad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये मोठी राजकीय खेळी खेळली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या एकाच पक्षप्रवेशाने तटकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांची भविष्यातील आमदारकी सेफ केली आहे. सध्या श्रीवर्धन मतदार संघातून त्यांची कन्या आदिती तटकरे आमदार आहेत. तर अनिकेत तटकरे हे विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आमदार आहेत. (Sunil Tatkare brings Shiv Sena spokesperson Rajeev Sable into NCP to secure political legacy for Aditi and Aniket Tatkare ahead of 2025 elections)
रायगड जिल्ह्यात सध्या मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात पालकमंत्रीपदाचा वाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच तटकरे यांनी कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक आणि त्यानंतर होणाऱ्या विधानपरिषदेची निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्यांनी गोगावले यांच्यासह शिवसेनेला शह दिला आहे. तटकरे यांनी यापूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून गोगावले यांना मतदारसंघातच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला.
आता शिवसेनेचे प्रवक्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून अनिकेत तटकरे आणि आदिती तटकरे यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धीच कमी केला आहे. साबळे यांचा प्रभाव असलेल्या माणगावसह लोणेरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्वा आणि इंदापूर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण श्रीवर्धन मतदार संघात येत असल्याने आदिती तटकरे यांचा मतदार संघ साबळेंच्या प्रवेशामुळे मजबूत झाला आहे.
याशिवाय विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 2018 मध्ये अनिकेत तटकरे विरुद्ध शिवसेनेचे राजीव साबळे अशी थेट लढत झाली होती. अनिकेत तटकरे यांच्या राजकीय प्रवेशाची ही पहिली लढत होती. यात तटकरे यांनी बाजी मारली होती. पण साबळे यांनी हार न मानता पुन्हा तयारी सुरु केली होती. पण पक्षाकडून त्यांना पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. हीच नाराजी तटकरे यांनी हेरली आणि साबळे यांच्यासाठी गळ टाकला.
2018 च्या आकडेवारीनुसार कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 941 मतदार आहेत. यात सर्वाधिक 469 हे रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे रायगडमधील उमेदवार या निवडणुकीत महत्वाचा ठरतो. आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हेच राजीव साबळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने तटकरे यांनी आपल्या मुलांची आमदारकी सेफ केल्याची चर्चा आहे. साबळे यांच्यासह तटकरे यांनी माणगाव नगरपंचायतीत शिवसेनाल सुरुंग लावला आहे.
साबळेंसह माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे आणि शिवसेनेच्या बहुतांश माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माणगाव तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी, विविध समाजसेवी संघटना, पतसंस्थांचे पदाधिकारी, सामाजिक मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते असे हजारो कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
माजी आमदार स्व. अशोक साबळे यांचे पुत्र अॅड. राजीव साबळे हे राजकारणात अजातशत्रू मानले जातात. ते यापूर्वी चार वेळा रायगड जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे 33 वर्षे अध्यक्ष असून ते सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्षही आहेत. त्यांचे विविध पक्षातील नेत्यांशी जवळचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. साबळे यांचा माणगाव नगरपंचायतीसह लोणेरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्वा आणि इंदापूर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात दांडगा जनसंपर्क असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाचही विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळू शकते.
1. राजीव साबळे कोणत्या पक्षातून राष्ट्रवादीत आले आहेत?
→ राजीव साबळे हे शिवसेनेचे प्रवक्ते होते आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
2. या पक्षप्रवेशाचा कोणाला फायदा होणार आहे?
→ सुनील तटकरे यांच्या दोन्ही मुलांना – आदिती तटकरे (आमदार, श्रीवर्धन) आणि अनिकेत तटकरे (विधान परिषद आमदार) – यांना आगामी निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
3. हा पक्षप्रवेश का महत्त्वाचा मानला जातोय?
→ कारण तो रायगडमधील राजकीय समीकरणे बदलणारा आहे. यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला धक्का बसला आहे आणि राष्ट्रवादी गट बळकट झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.