Raigad News : रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून, रायगडची जबाबदारी शिंदेंच्या शिवसेनेकडे, तर नाशिक भाजपकडे गेलं आहे. यानंतर रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले असून, मंत्री भरत गोगावलेंचे खंदे समर्थक असणारे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, या वादावरून तटकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. ते रोहा येथील धाटावमध्ये पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
महायुतीत मिठाचा खडा टाकणारा मुद्दा सोडवत प्रमुख नेत्यांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे दिली. यानंतरही येथील वाद थांबलेला नाही. आमदार दळवी आणि थोरवे यांच्याकडून तटकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. तर या टीकेवर आमदार अनिकेत तटकरे पलटवार करताना दिसत आहेत. या वाढलेल्या वादावर संयमी पवित्रा घेणाऱ्या तटकरेंनी आता मौन सोडलं आहे. त्यांनी, आक्रमक पवित्रा घ्यायची वेळ आली, तर तो घेतल्याशिवाय राहत नाही, मात्र काही वेळा संयमाची भूमिका घ्यावी लागते, असं म्हटलं आहे.
‘मी गप्प का होतो, याचं उत्तर काळाच्या ओघात मिळतं,’ असा सूचक इशारा दिला आहे. तसेच अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद उमेदवारीवर बोलताना, ‘मी गप्प राहिलो म्हणूनच अनिकेत भाईंना विधान परिषद उमेदवारी मिळाली. ती बिनविरोध झाली. संयमाचं फळ काय असतं, हे आपण अनुभवलं,’ असे म्हटलं आहे.
दरम्यान, तटकरे यांनी इतर मुद्द्यांकडे न जाता थेट कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीला अजून 3 वर्षे बाकी आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकींकडे लक्ष द्या. आपल्याला जास्तीत जास्त विजय हा संपादन करायचा आहे.
पावसाळा संपताच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल करायची आहे. मागे आपण 24 ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. मात्र, यंदा चांगलं काम करून जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकायच्या आहेत. त्यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन देखील तटकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
तटकरे यांनी जिल्ह्यात शांतपणे काम करू म्हणजे जनतेचा आपल्यावर अधिक विश्वास बसेल, असे देखील म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना होईल, असा तर्क लावला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.