

Raigad Political News : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्यानंतर येथील महायुतीतील वाद कमी होईल, अशी शक्यता होती. पण तसे काहीच झालेले नसून, उलट राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात वादाचे खटके उडताना दिसत आहेत. नुकताच भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभातही यावरून जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांनी, निवडणुका संपल्या असून आता विकासकामांकडे लक्ष द्या, असा टोला शिंदेंच्या शिलेदारांना लगावला आहे. यामुळे रायगडचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेमध्ये एकीकडे भाजपचा अध्यक्ष असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये निधी वाटपावरून खटके उडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर अद्याप वाद थांबलेला नाही. आमदार महेंद्र दळवी हे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर निशाणा साधत, गोगावले आणि थोरवे यांच्यामुळेच 'सरोगसी बाळ' राजकारणात जन्माला आल्याची टीका केली होती. ज्यावरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही.
अशातच आमदार थोरवे यांनी देखील गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभातच राष्ट्रवादी रडीचा डाव खेळत असल्याचे सांगत, विकासकामांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप केला. तर उपस्थित मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील तटकरेंवर निशाणा साधत डिवचले. कर्जतमधील रेल्वे पुलांच्या कामावरून त्यांनी तटकरेंवर तोफ डागली.
‘मी कोणाच्याही कामाचं श्रेय घेत नाही. माझ्या कामाची पद्धत त्यांना माहिती नसेल, त्यांच्यापेक्षा मी सिनियर’ आहे. गोगावले यांनी तटकरेंना ही कामाची पद्धत समजावून सांगावी आणि चुकीचा भ्रम पसरवू नये, असा सल्ला दिला. तर आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका आणि दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नदेखील करू नका, अशा शब्दांत तटकरेंना बजावले. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, नेत्यांमधील मतभेद आणि तणाव अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, तटकरे यांनी या सर्व वादावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. बारणे यांच्या वक्तव्यावर त्यांनी संयमाचा पवित्रा घेतला. बारणे आणि माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत. आप्पा बारणे हे माझे मित्र असून, ते माझ्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतील, असं मला वाटत नाही, असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पण गेल्या काही दिवसांपासून आमदार दळवी आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यात उडालेली राजकीय धुमश्चक्री आणि वैयक्तिक पातळीवर एकमेकांना केलेले लक्ष्य यावर तटकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दळवी आणि थोरवे यांच्यावर थेट निशाणा साधत, वाद भानगडी बाजूला ठेवून सगळ्यांनी विकासाकडे लक्ष केंद्रित करावं, अशी विनंती महायुतीतील घटक पक्ष असलेल्या सर्वांना केली. तसेच, आताची पुढची तीन वर्षे विकास करण्याची असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.
तटकरे म्हणाले, सध्या जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका संपल्या असून, आता राजकीय तट उरलेले नाहीत. यामुळे राजकीय कुरघोड्यांना लगाम घालून विकासकामांवर लक्ष द्या. विकासकामांसाठी तब्बल तीन वर्षांचा अवधी आहे, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. याचबरोबर त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्याचे स्वागत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.