Shivsena UBT Crisis; Bhaskar Jadhav and Milind Narvekar sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता? मिलिंद नार्वेकरांच्या 'त्या' खोचक ट्विटला भास्कर जाधवांचे उत्तर; वादावर पाणीही टाकलं!

Bhaskar Jadhav vs Milind Narvekar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे आधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असतानाच पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील वादाने आणखीन डोकेदुखी वाढवली आहे.

Aslam Shanedivan

Shivsena UBT Crisis : राज्यात २०२२ नंतर पुन्हा शिवसेनेत बंड झाले असून या बंडाचे मूळ एकनाथ शिंदे असल्याचे समोर आले आहे. तर त्यांनी राबवलेल्या 'ऑपरेशन टायगर'मुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल सहा खासदार फुटले आहे. या बंडामुळे ठाकरेंची दिल्लीतील ताकद कमी झाली असून शिंदेंची ताकद राज्यासह दिल्लीत वाढली आहे. यातच आता त्यांचे १४ आमदार देखील फुटीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी ठाकरेंचे टेन्शन वाढवले असतानाच पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील वादाने यात आणखी भर घातली आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता व्यक्त होत आहे.

या वादामुळे पक्षातील दुफळी चव्हाट्यावर आल्यानंतर आता भास्कर जाधव यांनी या वादावर पाणी टाकत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, आपल्यात आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात कधीच आणि कोणताच वाद नव्हता. कोणतेही मतभेद नव्हते, हा प्रकार निव्वळ गैरसमजातून घडल्याचे सांगितले आहे. तर आपल्या डोक्यात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर असल्याचे ते म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दाखल होत असताना भास्कर जाधव यांनी सतत होणाऱ्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर संताप व्यक्त केला होता. तसेच येणाऱ्या गाडीकडे रागाने बघत नार्वेकर कोण लागून गेला? असा संतप्त सवाल केला होता. याच व्हिडिओमुळे वादाला सुरूवात झाली.

तर यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी खोचक ट्विट करत भास्कर जाधव यांना टोला लगावला. नार्वेकरांनी आपल्या पोस्टमध्ये, "माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत असल्याचे म्हटले. आता हीच पोस्ट वादाचे कारण ठरली असून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

यावर आता भास्कर जाधव यांनी सोमवारी (ता.२२) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, नार्वेकर यांच्याशी कोणतेही मतभेद नसून हा प्रकार निव्वळ गैरसमजातून घडला असल्याचे म्हटलं आहे. तर त्यावेळी नेमकं काय झालं हे सांगताना, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. अनेकांना आत जायचं होतं, पण ते शक्य होतं नव्हतं. यावेळी मला काही शिवसैनिकांनी विनंती केली आणि मी गाडीतून खाली उतरलो.

शिवसैनिकांना समजावत आणि प्रसारमाध्यमांशी बोलत गेटच्या आत आलो. पण याचवेळी सातत्याने कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न वाजत होता, तो बराच वेळ वाजत होता. तर जेव्हा गाडी गेटच्या आत आली तेव्हा काही शिवसैनिक खाली पडले. यावर मी विचारल्यावर ती गाडी नार्वेकरांची असल्याची माहिती पत्रकार मॅडम यांनीच दिली.

यावर मी ते भाष्य केलं. मी काही आमच्या नार्वेकरांबद्दल बोललो नाही. तर माझ्या डोक्यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले. त्यांच्या कामकाजाची पद्धतच डोक्यात बसली आहे. त्यामुळे मला कोण नार्वेकर हे क्लिक झालं नाही आणि मी बोलून गेलो. पण माझ्या बोलण्याचा रोख हा गर्दी असताना आमच्यासारख्या नेत्यांनी किमान चार पावलं चालावं असा होता, असेही स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिले.

माझे कोण हा नार्वेकर? हे शब्द त्यांना लागला असेल. पण मी तर त्यांना कणखर समजतो. त्यांचे सगळ्या पक्षातील लोकांशी चांगले संबंध असून ते जगजाहीर आहेत. ते माझेही चांगले मित्र असून त्यामुळेच त्यांनी जे ट्विट केलं, ते मला विरोधी पक्षनेते करण्यासाठी. ते जर मुख्यमंत्र्यांकडून तसं करुन घेणार असतील तर मला आनंदच आहे.

पण आता जर मला विरोधी पक्षनेता न केल्यामुळे कोणाला काही त्रास होत असेल आणि तो नार्वेकर यांनाच जास्त त्रास होत असावा. मला याचाही आनंद आहे. आमचं काही भांडण नाही. आता नार्वेकरांनीच सांगितलं आहे, यामुळे मी लवकर विरोधी पक्षनेता होईन, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांनी मला फस्ट्रेट म्हटले तरी मी त्यांना हळवा म्हणतो, असाही खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

नेमकं काय होतं नार्वेकरांच्या ट्विटमध्ये?

Frustration!

माननीय मुख्यमंत्री महोदय

@Dev_Fadnavis

जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT