Thane NCP political developments: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत, "भटकलेले पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परततात. वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, वीरूला त्याच्या आईनेच परत पाठवले," असा टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीनंतर वीरू वाघमारे यांनी अजित पवारांची साथ दिली होती. हेमंत वाणी यांनीही त्यावेळी पक्षांतर केले होते. मात्र, ठाण्यातील अजित पवार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना योग्य सन्मान आणि संधी मिळत नसल्याचा आरोप करत दोघांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात परतण्याचा निर्णय घेतला.
या पक्षप्रवेशावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हा आपल्या वाढदिवसाची मोठी भेट असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजित पवार यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
पक्षप्रवेशानंतर बोलताना वीरू वाघमारे यांनी शरद पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. "जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालतात. त्यामुळे आम्ही स्वगृही परतत आहोत," असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजित पवार राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका करत, "अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली," अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
ठाण्यातील युवक संघटनेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.