Narayan Rane's Birthday ceremony
Narayan Rane's Birthday ceremony Sarkarnama
कोकण

नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही : दरेकरंनी उधळली स्तुतीसुमने

सरकारनामा ब्यूरो

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : आपल्यावर आलेल्या सर्व संकटांवर मात करून पुढे जाण्याची उमेद देणारा राजकीय नेता म्हणजे नारायण राणे (Narayan Rane). आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री एवढी पदे मिळवित असताना त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर काटे, संकटे आली. पण, ती दूर करीत ते या पदांवर पोचले. राजकीय क्षेत्रात काम करत असताना नेमका अभ्यास कसा करायचा, हे त्यांच्याकडून शिकता आले. कोकणचा विकास होण्यासाठी अजून किमान २० वर्षे नारायण राणे सक्रिय पाहिजेत. कारण, त्यांच्या उंचीएवढा कोकणात दुसरा नेता नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वाढदिवसाच्या कार्यक्रमात कौतुक केले. (There is no other Big leader like Narayan Rane in Konkan : Praveen Darekar)

सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे जिल्हा भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले की, ‘‘आयुष्यात काय करायचे, ते कसे करायचे, या प्रश्नांच्या उत्तरासाठी नारायण राणेंचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्याकडे असलेल्या लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचा महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठे योगदान आहे. हे खाते मोठ्या विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेत्याला दिले. राज्याच्या बजेटच्या दुप्पट पैसे बजेटमध्ये या आपल्या एमएसएमई खात्याला प्रावधान केले आहेत. त्याचा उपयोग कोकणच्या विकासासाठी, उद्योग जगत वाढविण्यासाठी झाला नाही, तर राणेंचा सत्तरावा वाढदिवस सार्थकी लागला, असे म्हणता येत नाही. अडचणी असतील तर कायद्यात बदल करून तो प्रकल्प मार्गी लावणारा नेता कोण असेल, तर नारायण राणे. राज्य सरकार उद्योग प्रस्ताव मोठ्या प्रमाणात पाठवित नाही. कारण त्याचे श्रेय भाजप व राणेंना मिळेल; परंतु राणेंनी हा नियमच बदलत थेट केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यास परवानगी दिली.’’

आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ‘‘संघर्ष, जिद्द आणि यश या तिघांचे उत्तम उदाहरण म्हणजे नारायण राणे. राणे हे नाव आम्ही लहानपणापासून ऐकत, पाहत आहोत. त्यांची जीवनशैली जेवढी मोठी, त्यापेक्षा त्यांचा संघर्ष मोठा राहिला आहे. मी राणेंना फॉलो करतो. त्यामुळे मी रोज टीव्हीवर दिसतो. त्यांचा स्वभाव रागिष्ठ आहे; परंतु तेवढेच ते प्रेमळ आहेत. पुढचा वाढदिवस हक्काच्या नारायण भवनात साजरा करूया." आमदार कवाडे म्हणाले, "लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्यातून जिल्ह्याचा जीडीपी वाढेल. आर्थिक विकास साधेल. उद्योजक निर्माण करण्याची संधी आहे. संधी वाया घालवू नका. एमएसएमईची लाट प्रत्येक गावागावात पोहोचवा.’’

प्रमोद जठार म्हणाले की, ‘‘कोकणी माणूस आळशी, कामानिमित्त बाहेर जातो, हा कोकणला बसलेला टिळा फुसण्यासाठी राणेंनी आपल्या खात्याच्या वापर करून दहा वर्षांत कोकणात दुसरी मुंबई करून उद्योगनगरी करावी. विरोधक राणे यांना श्रेय मिळू नये, यासाठी धडपडत आहेत. रिफायनरीला राणेंनी विरोध केल्यामुळे त्यांनीही केला. आता राणे समर्थन देत असल्याचे बघून विरोधक समर्थन देत आहेत. चिपी विमानतळाच्या बाबतीत सुद्धा तसेच झाले.’’

जिल्हाध्यक्ष तेली यांनी, भाजप समजावी म्हणून मला नारायण राणेंनी पुढे पाठविले. म्हणून त्यांच्या आणि माझ्या सहवासात गॅप पडली. आज सर्व विरोधी पक्षांच्या एकत्रित ताकदी विरोधात भाजपची जास्त ताकद आहे. एकत्रित काम करूया. जिल्ह्यात पुढच्या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार व एक खासदार वाढणार आहे, असे सांगितले. यावेळी आमदार नीतेश राणे, मेघा गांगण, संध्या तेरसे, सुदेश आचरेकर यांचीही भाषणे झाली.

कोणालातरी आवडेल म्हणून राणे कोणती गोष्ट करीत नाहीत

नारायण राणे कधी राजकीय वाटत नाहीत. कोणालातरी आवडेल म्हणून ते कोणती गोष्ट करीत नाहीत. अनेक प्रसंग आले; त्याचे टेन्शनही आले; परंतु ते कधीच हरले नाहीत. त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत; पण बाबा, आता मला स्वप्नात पाहात असाल तर त्याचा पाठलाग करा, अशी हाक माजी खासदार नीलेश राणे यांनी यावेळी आपल्या वडिलांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT