Uday Samant, Yogesh Kadam
Uday Samant, Yogesh Kadam sarkarnama
कोकण

उदय सामंत, योगेश कदमांत मंत्रीपदावरून होणार रस्सीखेच...

Umesh Bambare-Patil

चिपळूण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांत रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांचा समावेश आहे. या दोघांपैकी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल, याची उत्सुकता संपूर्ण कोकणाला आहे.

उदय सामंत कोकणातील वजनदार नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले होते. शिवसेनेत आल्यानंतर त्यांना फडणवीस सरकारच्या काळात म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले होते. ठाकरे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. मात्र, रत्नागिरी जिल्हाऐवजी त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.

आता शिंदे सरकारमध्येही ते मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले होते. त्यामुळे शिंदे सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील. दापोलीचे आमदार योगेश कदम हे त्यांच्यासमोर मंत्री पदासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहेत.

योगेश कदम यांचीही पाहिलीच टर्म आहे. त्यामुळे कदमांना राज्यमंत्रीपद मिळाले तरी त्यांच्यासाठी ते महत्वाचे असेल. कारण आगामी काळ हा सामंत यांच्यापेक्षा कदमांसाठी खडतर असणार आहे. कारण सांमत यांच्या मतदारसंघात सक्षम विरोधक नाही. भाजप आणि सांमत यांची मते एकत्र झाली तर आगामी निवडणुकीत सामंत यांचा विजय सहज होईल. परंतू योगेश कदमांना विजयासाठी झगडावे लागणार आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून पुढील अडीच वर्षे बांधणी केली तर योगेश कदमांची बाजू भक्कम होवू शकते. योगेश कदम युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत.

पुत्र प्रेमाखातर..

तत्कालिन पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या वजनदार नेत्यांना हाताशी धरून माजीमंत्री रामदास आणि आमदार योगेश कदमांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे योगेश कदमांना मंत्रीपद देत युवा चेहऱ्याला संधी आणि कदम विरोधकांचे खच्चीकरण करण्याची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे. शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम समदुःखी होते. त्यामुळे रामदास कदम पुत्र प्रेमाखातर आपले वजन आणि शब्दही वापरण्याची शक्यता आहे.

कोण किती वजन वापरणार..?

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आमदार योगेश कदम दुसऱ्या दिवशी तर आमदार उदय सामंत सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झाले होते. भाजपच्या तुलनेत शिंदे गटाला फार कमी मंत्रीपदे येणार आहेत. त्यामुळे मंत्रीपदासाठी कोण किती वजन वापरणार, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT