Narayan Rane Uddhav Thackeray sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुद्दाम 'टार्गेट'? आधी बॅगांची तपासणी, आता राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट ताफाच अडवला

Bag Check Controversy Election Commission: उद्धव ठाकरे यांच्या बॅगा दोनदा तपासण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आज त्यांचा ताफाही अडवण्यात आला. त्यामुळे ठाकरेंचा पारा चढला.

Deepak Kulkarni

Sindhudurg News : बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या आणि उद्धव यांनी वाढवलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर उभी फूट पडली. ही फूट म्हणजे मातोश्री आणि ठाकरेंच्या अत्यंत जिव्हारी लागली. त्याचमुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) अंगावर घेत त्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे.

पण याच उद्धव ठाकरेंची एकदा नव्हे तर दोनदा बॅगांची तपासणी निवडणूक अधिकार्यांनी केली. यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरेंना मुद्दाम टार्गेट केले जात असल्याची चर्चा सुरु असतानाच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे निवडणूक अधिकार्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसून आलं. भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या सिंधुदुर्गात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. त्यांच्या एकाच दिवसांत तीन प्रचार सभा होणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बुधवारी (ता.13) गोव्यात विमानतळावर उतरुन गाडीने सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यानंतर ठाकरेंनी आपल्या गाडीची काच खाली घेतली. आधी बॅगांची तपासणी आता थेट गाडीच अडवल्याने ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे यांच्या बॅगा दोनदा तपासण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आज त्यांचा ताफाही अडवण्यात आला. त्यामुळे ठाकरेंचा पारा चढला.शिवाय गाडीत उद्धव ठाकरे आहे हे समजताच ताफा लगेच सोडून देण्यात आला.इन्सुली चेक पोस्टवर गाडी जेव्हा उद्धव ठाकरे यांची गाडी अडवली, तेव्हा तेजस ठाकरेही सोबत होते. पण ज्या अधिकाऱ्याने गाडी अडवली, तो क्षणात तिथून गायब झाला.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षांचं या निवडणुकीवरून महाराष्ट्रातील अस्तित्व ठरणार आहे. यामुळेच उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे तर आदित्य ठाकरे मुंबईसाठी रक्ताचे पाणी करताना दिसत आहे.हे बाप-लेक संपूर्ण भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंगावर घेत आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. यातून चढाओढ रंगली आहे.

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. राज्यात ते तब्बल 36 सभा घेत आहेत. यासाठी सभास्थळी वेळेत पोचण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हवाई मार्गाच्या वापरावर भर दिलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची हेलिकॉप्टरने हवाई उड्डाणे सुरू असतानाच, दोन दिवसांपासून त्यांना वेगळ्याच प्रसंगांना समोरे जावे लागत आहेत.

हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावरुन तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी झापलं. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. सर्वांना समान कायदा यानुसार निवडणूक आयोगाने मोदी, शाह यांची बॅग तपासावी. परंतु या बॅगा महाराष्ट्रात येताना नाहीतर जाताना तपासाव्यात, असे चॅलेंज दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT