Sindhudurg Political News : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची गुप्त भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. या भेटीनंतर वैभव नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्यामध्ये राजकीय वैर असल्याने ते भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गुप्त भेटीबाबत रवींद्र चव्हाण यांनी वैभव नाईक आणि नारायण राणे यांच्या बाबत महत्वाचे विधान केले आहे. (MLA Vaibhav Naik News)
कोकणाबाबतचा कोणताही निर्णय हा नारायण राणे यांना विचारल्याशिवाय, विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. याच वेळी आमदार वैभव नाईक हे भाजपमध्ये येणार नाहीत, असे देखील चव्हाण यांनी सांगितले नाही. त्यामुळे रवींद्र चव्हाण-वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता वाढली आहे.
रवींद्र चव्हाण (ravindra chavan) म्हणाले, जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आलो होतो. मुंबईवरून रेल्वेने प्रवास करत कोकण कन्या एक्सप्रेसने कणकवली येथे उतरलो. आणि कणकवली शासकीय विश्रामगृहामध्ये गेलो. पुढील दौऱ्यासाठी तयारी करून निघत असताना त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्या ठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आले. आणि त्या ठिकाणी भेट झाली.
कोकणात संघटनात्मक वाढीसाठी मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी हे माझ्या संपर्कात असतात. कोकणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना नारायण राणे यांना विचारल्याशिवाय, विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आम्ही करत नाही. कुणाला पक्षात घ्यायचे असेल तरी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले टाकली जातात, असे सांगत रवींद्र चव्हाण यांनी नाईक यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता देखील फेटाळली नाही.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.