Vaibhavwadi News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात विकासकामांच्या ठेक्यावरून सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. एका स्मशान शेडच्या कामावरून दोन ठेकेदारांमध्ये थेट रस्त्यावरच धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, महिनाभरात कामांच्या वाटपावरून वाद होण्याची ही तिसरी घटना असल्याने तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. विकासकामांपेक्षा ठेकेदारीच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.
वैभववाडीतील एका स्थानिक प्राधिकरणाकडे सध्या सुमारे 17 ते 18 विकासकामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या कामांचे संभाव्य वाटप आणि ठेकेदारांची निवड करण्यासाठी गुरुवारी (ता. 19) एका ठिकाणी बंद खोलीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील काँक्रिटची कामे सध्या मंजूर होणार नसल्याने बहुतांश ठेकेदारांचे लक्ष हॉटमिक्सच्या कामांकडे लागले आहे. याशिवाय इतर विकासकामांचे ठेके मिळवण्यासाठीही ठेकेदारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोणत्या कामासाठी कोण इच्छुक आहे, याची विचारणा केली.
याचदरम्यान, प्राधिकरणाच्या एका भागात सुमारे साडेनऊ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीचे स्मशान शेडचे काम मंजूर असल्याचा विषय पुढे आला. या कामाची निविदा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. संबंधित भागातील एका ठेकेदाराने हे काम आपण करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, दुसऱ्या भागातील त्याच पक्षाच्या आणखी एका ठेकेदारानेही या कामासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये या कामावरून सुप्त संघर्ष निर्माण झाला.
स्मशान शेडच्या कामावरून थेट रस्त्यावर धक्काबुक्की
दरम्यान, गुरुवारी सकाळी प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर अनेक ठेकेदार आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी स्मशान शेडच्या ठेक्यावरून संबंधित दोन ठेकेदारांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही वेळातच या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. कार्यालयाबाहेरील रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत ठेक्यांच्या वाटपावरून वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी आणखी दोन ठेकेदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका पक्षाच्या कार्यालयातच विकासकामांच्या देवाणघेवाणीवरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली होती. आता थेट रस्त्यावर ठेकेदारांमध्ये धक्काबुक्की होऊ लागल्याने वैभववाडीत या प्रकाराची चर्चा रंगली आहे.
विकासकामांपेक्षा ठेकेदारीच्या राजकारणाचीच चर्चा
नागरिकांना विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा असते. त्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या कामांचा दर्जा, गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता यापेक्षा कोणाला ठेका मिळणार, यावरूनच अधिक रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र या घटनांमधून समोर येत आहे.
विकासकामांच्या नावाखाली ठेकेदारीवरून सुरू असलेले राजकारण आता चव्हाट्यावर आले असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक निधीतून होणारी कामे दर्जेदार व्हावीत की ठेके मिळवण्यासाठीच राजकीय संघर्ष सुरू राहावा, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.