

Begusarai Congress Leader Shooting News: बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचदरम्यान, बेगुसराय जिल्ह्यातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. बुधवारी(ता.18) मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांकडून स्थानिक काँग्रेस नेते कुमार गौरव यांच्या वाहनावर सात राऊंड गोळीबार करण्यात, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ही घटना झिरो माईल पोलीस चौकीच्या हद्दीतील पपरौर गावात घडली.
याप्रकरणी झिरो माईल पोलिस चौकीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काँग्रेस नेते गौरव कुमार हे सकाळी 11.50 च्या सुमारास पपरौर स्मशानभूमीजवळील एका भूखंडाची पाहणी करण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी त्यांच्या एसयूव्ही (SUV) गाडीवर गोळीबार केला, मात्र ते यातून सुखरूप बचावले, असे पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) निखिल कुमार यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) निखिल कुमार म्हणाले, "गौरव कुमार यांच्यावर किमान सहा ते सात राऊंड फायर करण्यात आला. गौरव सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. हल्लेखोरांची लवकरच ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल," अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून आवश्यक ती कायदेशीर आणि तपासाची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षकांनी पुढे सांगितले. या हल्ल्यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत पोलिस तपासातून हल्ल्यामागचं नेमकं कारण समोर येईल असंही कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
गौरव कुमार यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून या प्रकरणातील हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे.
पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्यानंतर वाहनावर गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत, तसेच झिरो माईल पोलीस चौकीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेगुसराय जिल्ह्यातील पपरौर कब्रस्तानाजवळ बुधवारी (18 नोव्हेंबर) सकाळी सुमारे 11.50 वाजता ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या एसयूव्ही (SUV) कारचा पाठलाग करून गोळीबार केला. कारवर सुमारे सहा ते सात गोळ्या लागल्याची माहिती आहे. घटनेवेळी गौरव कुमार यांच्या कारमध्ये चालकासह तिघेजण उपस्थित होते. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी वेगात पुढे नेल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.