वेंगुर्ले पालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिंदे सेना, काँग्रेस आणि ठाकरे सेना अशा चार प्रमुख पक्षांकडून तगडे उमेदवार उतरल्याने चौरंगी लढत रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनामुळे शरद पवार गट पूर्णपणे रिंगणाबाहेर राहिला असून अजित पवार गटाने मात्र तीन उमेदवार उतरवून जोरदार उपस्थिती दाखवली आहे.
शहरातील मतदार आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष या चुरशीच्या लढतीकडे लागून राहिले आहे.
Sindhudurg News : तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत असून येथील पालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई होणार आहे. एकीकडे महायुतीतील तिनही पक्ष आणि काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरली असतानाच येथे सत्ता भोगणारी शरद पवार यांची राष्ट्रवादीची पाटी कोरी राहल्याचे दिसत आहे. यामुळे याची राज्यभर आता चर्चा होताना दिसत आहे.
पालिकेच्या निवडणुकीत चौरंगी लढत असल्याने व सर्वच पक्षाकडून प्रबळ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप, शिंदे शिवसेनेचे नागेश उर्फ पिंटू गावडे, राष्ट्रीय काँग्रेसचे विलास गावडे व ठाकरे शिवसेनेकडून रिंगणात उतरलेले संदेश निकम हे चारही तगडे उमेदवार रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून नागरी कृती समितीचे नंदन वेंगुर्लेकर व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ टोमके हेही आपले भवितव्य नगराध्यक्षपदासाठी आजमावत आहेत. एकंदरीत चित्र पाहिलं तर खऱ्या अर्थाने बहुरंगी लढत मानली जात आहे. यामुळे यावेळच्या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील पालिकेची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून आता नाक्यानाक्यावर कोणाचे पारडे किती जड आहे? याबाबतच चर्चा होताना दिसत आहे. 27 नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे उचल घेऊन आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणला होता. त्यावेळच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या नेतृत्वाचा करिष्मा वेंगुर्लेवासीयांना दाखविला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भाजपने हे अनपेक्षित यश मिळवून त्याकाळी शहरात प्रबळ असलेल्या काँग्रेस व शिवसेना पक्षांना धोबीपछाड दिला होता.
दिलीप उर्फ राजन गिरप हे त्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या कमळ चिन्हावर विराजमान होणारे पहिले नगराध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्याचे सर्वांत वजनदार नेते नारायण राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते. आमदार दीपक केसरकर हे अखंड शिवसेनेचे प्रमुख नेते होते. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक तेवढी सोपीही नव्हती. मात्र, माजी नगराध्यक्ष संदेश निकम आणि माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून धम्माल उडवून दिली होती.
सुनील डुबळे, संदेश निकम यांच्यामुळे भाजपचा फायदा झाला होता. डुबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले बाबली वायंगणकर यांना फटका बसला, संदेश निकम यांच्या उमेदवारीचा फटका शिवसेनेच्या रमण वायंगणकर यांना बसला होता. अपक्ष उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागल्या गेलेल्या मतांचा फायदा दिलीप गिरप यांना झाल्याने ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते.
भाजपकडून लढताना विजयी झालेले दिलीप गिरप यांनी 2016 च्या निवडणुकीत 1990 मते मिळविली होती. अपक्ष उमेदवार सुनील डुबळे यांनी दुसऱ्या क्रमांकावर राहत 1293 मतांपर्यंत मजल मारली होती. शिवसेनेचे उमेदवार रमण वायंगणकर यांना 1226 तर अपक्ष संदेश निकम यांना 1024 मते मिळाली होती. त्या काळात वेंगुर्लेत काँग्रेसचा दबदबा असूनही त्यांचे उमेदवार बाबली वायंगणकर यांना मात्र 948 एवढीच मते मिळाली होती. काँग्रेस व शिवसेनेमधील अंतर्गत दुफळीचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला होता.
नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला तरी नगरसेवक पदावर भाजपचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. यात प्रशांत आपटे, विनायक उर्फ सुहास गवंडळकर, नागेश उर्फ पिंटू गावडे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर यांचा समावेश होता. तर, नारायण राणेंच्या काँग्रेसला नगराध्यक्षपद गमवावे लागले असले तरी त्यांचे सात नगरसेवक निवडून आले होते.
यात विधाता सावंत, महेश उर्फ प्रकाश डिचोलकर, स्नेहल खोबरेकर, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव व कृपा गिरप यांचा समावेश होता. तर दीपक केसरकर यांच्या शिवसेनेला केवळ अस्मिता राऊळ या एकाच नगरसेवक पदावर समाधान मानावे लागले होते. श्री. निकम व तुषार सापळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय खेचून आणला होता. त्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभे असलेले तात्कालीन नगराध्यक्ष (कै.) प्रसन्न कुबल यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागला होता.
यंदाच्या निवडणुकीतील चित्र असे....
या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या दिमतीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नीतेश राणे यांचेही बळ आहे. युवा नेते विशाल परब व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनीही भाजप उमेदवार निवडून येण्यासाठी रणनीती आखली आहे. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणेही मैदानात उतरले आहेत. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्यासारखे काम करणारे अभ्यासू नेतृत्व शिंदे शिवसेनेकडून निवडणुकीची सर्व घुरा सांभाळत आहेत.
ठाकरे शिवसेना पक्षानेही 17 जागांवर उमेदवार देऊन आपणही पूर्ण ताकदीने उतरत असल्याची वर्दी दिली आहे. संदेश निकम यांनी आपली ताकद या निवडणुकीत संपूर्ण पणाला लावली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व करणारे नारायण राणे भाजपचे खासदार असल्याने ही मोठी ताकद काँग्रेसकडे उरलेली नाही. मात्र, गेली अनेक दशके काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून परिचित असलेले विलास गावडे या निवडणुकीत स्वतः नगराध्यक्षपदासाठी लढत असल्याने काँग्रेसची आशा पल्लवीत झाली आहे.
शरद पवार यांच्या गटाची पाटी कोरी
येथील पालिकेत अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची पुसटशी झलक या निवडणुकीत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादीचीही शकले झाली असल्याने कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. मित्रपक्षांनी अखेरीस गृहितथ धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक रिंगणातील पाटी कोरीच आहे. तर अजित पवार गटाने नेटाने तीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
FAQs :
चार प्रमुख पक्ष—भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना—तगड्या उमेदवारांसह रिंगणात उतरले आहेत.
पक्ष विभाजनामुळे शरद पवार गट रिंगणात नाही, तर अजित पवार गटाने तीन उमेदवार उतरवले आहेत.
चारही पक्षांकडून अनुभवसंपन्न आणि लोकप्रिय उमेदवार मैदानात असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.
मित्रपक्षांच्या निर्णयांमुळे त्यांना जागा मिळाली नाही, परिणामी त्यांची पाटी कोरी राहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.