Raigad Politics : Shivsena NCP Political Conflict; Sunil Tatkare, Bharat Gogawale, Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Raigad Politics : ‘एकेकाळचा सत्तेतील शेकाप आज संपला; कुरघोडी राष्ट्रवादीची मैत्री लांब ठेवा' : विकास गोगावलेंचा शिवसेनेला सूचक इशारा

Raigad Shivsena NCP Political Conflict : रायगडच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अशातच नुकताच झालेल्या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यातच शिवसेना नेत्याने थेट स्वकियांनाच इशारा दिला आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगडच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. राज्यात महायुतीत एकत्र असलेले पक्ष रायगडमध्ये मात्र एकमेकांविरोधात राजकीय डावपेच आखताना दिसत आहेत. नेत्यांमधील या संघर्षात आता कार्यकर्तेही आमनेसामने येत असून एकमेकांचे पक्ष फोडण्यापर्यंत राजकारण पोहोचले आहे. नुकताच रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

'शिवसेनेची शेकापसारखी अवस्था होऊ देऊ नका'; विकास गोगावलेंचा थेट सल्ला

रोह्यातील पक्षप्रवेश सोहळ्यात विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुरघोडीच्या राजकारणावर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) राजकीय स्थितीची आठवण करून दिली. एकेकाळी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सत्तेवर असणारा आणि मजबूत जनाधार असलेला शेतकरी कामगार पक्ष आज राजकीयदृष्ट्या कमकुवत झाला आहे.

त्याच उदाहरणाचा दाखला देत विकास गोगावले यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. 'जिल्ह्यात एकेकाळी सत्तेत असणारा शेतकरी कामगार पक्ष आज संपला आहे. शिवसेनेचीही तीच अवस्था होऊ नये, म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी असलेली मैत्री थोडी लांब ठेवा,' असे आवाहन त्यांनी व्यासपीठावरून केले. तसेच वरिष्ठ नेत्यांनीही याबाबत विचार करावा, अशी विनंती केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष तीव्र

रायगडच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रायगड जिल्ह्यात मात्र स्थानिक वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः श्रीवर्धन, रोहा, माणगाव आणि पेण परिसरातील राजकीय घडामोडींना या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. रायगडमध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला धक्का देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये आमदार महेंद्र दळवी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर आमदार महेंद्र थोरवे हेही खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

भाजप-राष्ट्रवादीच्या जवळिकीवरून शिवसेनेत नाराजी?

या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय जवळिकीवरून अप्रत्यक्षपणे स्वपक्षीय नेत्यांचेही लक्ष वेधले आहे. राज्यात ज्याप्रमाणे महायुती आहे, त्याच धर्तीवर रायगडमध्येही महायुती व्हावी, अशी इच्छा शिवसेनेकडून अनेकदा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला अपेक्षित राजकीय सहकार्य दिले नसल्याची भावना शिवसेनेच्या गोटात असल्याचे बोलले जाते.

दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेला राजकीय शह देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक साधल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. रायगड जिल्हा परिषदेत भाजपने अध्यक्षपद मिळवत आपली राजकीय पकड मजबूत केली. त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर शिवसेनेलाही सत्तेत सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, विकास गोगावले यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हे मतभेद अजूनही कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.

शेकापचा बालेकिल्ला कसा ढासळला? भाजपच्या विस्ताराचा मोठा परिणाम

रायगडच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची एकेकाळी मोठी ताकद होती. जिल्ह्यात चार ते पाच आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेल्या शेकापचा रायगडमधील राजकीय प्रभाव कालांतराने कमी होत गेला. विशेषतः भाजपने जिल्ह्यात विस्तारवादी रणनीती आखल्यानंतर शेकापच्या संघटनात्मक ताकदीला मोठे आव्हान निर्माण झाले.

शेकापमधील अनेक बडे आणि जनाधार असलेले नेते भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये धैर्यशील पाटील, माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील, आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आणि विश्वास भगत यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसला.

त्यानंतर भाजपने शेकापचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, माजी पदाधिकारी आणि सहकारी बँकांशी संबंधित नेत्यांनाही आपल्या पक्षात सामावून घेतले. परिणामी, एकेकाळी रायगडच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शेकापची राजकीय पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात शेकापला अपेक्षित यश मिळवता आले नाही. अलिबागसह जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून न येणे हा पक्षासाठी मोठा राजकीय धक्का ठरला.

शेकापच्या उदाहरणातून शिवसेनेला सावध राहण्याचा इशारा?

शेकापच्या राजकीय घसरणीचा हाच संदर्भ देत विकास गोगावले यांनी शिवसेनेच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या राजकीय मैत्रीबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मित्रपक्षांशी असलेली जवळीक भविष्यात स्वतःच्या पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम करणारी ठरू शकते, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.

एकीकडे रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपमधील स्थानिक राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्या वक्तव्याला केवळ एका पक्षप्रवेश सोहळ्यातील भाषण न मानता रायगडमधील महायुतीच्या राजकारणाला दिलेला राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे. आगामी काळात रायगडमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यातील स्थानिक राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात, तसेच वरिष्ठ नेते या अंतर्गत संघर्षावर काय भूमिका घेतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT