

Ratnagiri News : महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी एकमेकांवर टीका करताना भान राखले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना अप्रत्यक्षपणे समज दिली आहे. श्रीवर्धन येथील पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेची दखल उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. यासंदर्भात शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी दळवी यांना समज दिल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच दळवी यांच्या वक्तव्याशी शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महेंद्र दळवींच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची नाराजी?
रत्नागिरीतील जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी महायुतीतील घटक पक्षांमधील वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, महायुतीमध्ये एकत्र काम करत असताना एकमेकांवर टीका करताना भान राखणे आवश्यक आहे.
श्रीवर्धन येथील पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणाच्या ओघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत काही वक्तव्ये केली होती. या प्रकरणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. शिंदे यांनी दळवी यांना समज दिली असून माझीही त्यांच्याशी चर्चा झाली आहे. भविष्यात महायुतीमध्ये असताना अशा प्रकारची टीका होऊ नये, हीच एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचे सामंत यांनी सांगितले.
गोगावले, तटकरे, दळवी आणि थोरवेंनाही सामंतांचा सल्ला
महायुतीमध्ये काम करताना सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाणे गरजेचे आहे. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी या सर्वांनी महायुतीचा घटक असल्याची जाणीव ठेवून काम केले पाहिजे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
कर्जत विधानसभा मतदारसंघात सध्या दोन्ही बाजूंनी टीका-टिप्पणी केली जात आहे. ही टीका दोन्ही बाजूंनी थांबली पाहिजे. केवळ एका बाजूने टीका थांबवून उपयोग होणार नाही. महायुतीमध्ये निर्माण झालेली दरी भरून काढणे आवश्यक आहे. महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद किंवा संघर्ष महायुतीमध्ये असता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचेही सामंत यांनी सांगितले.
संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देण्यास सामंतांचा नकार
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कथित 'ऑपरेशन टायगर'बाबत केलेल्या टीकेवरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्यांच्या वक्तव्यातून आम्ही टायगर आहोत, हे त्यांनी एका प्रकारे मान्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना मी त्यांना चांगला वाटत होतो.
मात्र, लोकशाहीतील निर्णय घेऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर काही लोकांसाठी मी वाईट झालो. गेली साडेचार वर्षे हे ऐकत आलो आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभारी घेतली आहे, असा दावाही सामंत यांनी केला. तसेच 'ऑपरेशन तीन' नेमके कधी होणार, त्याची तारीख, वार आणि वेळ, सकाळी की दुपारी की मध्यरात्री, हे सर्व लवकरच कळेल, असे सूचक विधान करत त्यांनी राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.