Operation Tiger in Ratnagiri Uday Samant And uddhav thackeray sarkarnama
कोकण

Konkan Shivsena Politics : ठाकरे गटाला कोकणात पुन्हा जोरदार धक्का! प्रमुख नेत्यासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम

Uday Samant on Operation Tiger in Ratnagiri : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी कोकणाची ओखळ आता राजकीय पटलावरून पूसली जाण्याची शक्यता आहे. येथे ऑपरेशन टायगर स्थानिकच्या तोंडावर पुन्हा जोर धरत आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : स्थानिकच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरला वेग आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टार्गेट केलं असून जिल्ह्यातील उरसी सुरलीही ठाकरे शिवसेनाही संपवण्याकडे पावले टाकली आहेत. सामंत यांनी ठाकरे गटाला धक्का देताना चिपळूणच्या माजी तालुकाप्रमुखासह प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना फोडले आहे. त्यामुळे आगामी स्थानिकच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

जिल्ह्यात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री उदय सामंत उद्योगांसोबतच विकासाचा झंझावात आणत आहेत. त्यामुळे आपणही बाळासाहेबांच्या विचारासोबत गेलो पाहिजे, ही भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची झाली आहे, असे स्पष्टीकरण देताना उबाठा शिवसेनेचे चिपळूणचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी शिवसेना सोडण्याचे भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यात शिवसेना उरलीच कुठे असा सवाल करतानाही नव्याने पक्षात येणाऱ्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे.

झगडे यांनी, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात सन्मान दिला जातोय. याच लोकांच्या हातात पक्षाची धूरा देवून जुन्या शिवसैनिकांना पक्षाची निष्ठा शिकवण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. पण गेली वर्षांनुवर्ष ज्यांच्या विरोधात काम केलं आज त्यांच्यासोबत काम करताना कुठे तरी आपण स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर होत असल्याची भावना निर्माण होतेय असल्याचेही झगडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच काम करणार असल्याचे झगडे यांनी जाहीर केलं आहे.

काहीच दिवसांच्या आधी झगडे यांनी उबाठा शिवसेनेच्या चिपळूण तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पण ते कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान त्यांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची चिपळूण दौऱ्यात भेट घेतली होती. त्यानंतरच झगडे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाल्या होत्या. पण यावर स्पष्टीकरण देताना अद्याप यावर कोणताच निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले होते. यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना उदय सामंत यांच्या नेतृत्वात आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांच्या सोबत माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे व सहकारी उपस्थित होते.

राऊतांवर टीका

गेली साडेतीन वर्षे शिवसेनेसाठी काम करणाऱ्या झगडे यांनी यावेळी पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्यांनी, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनाला चांगले दिवस आम्ही दाखवले. पण याची दखल घेण्याची तसदी पक्ष नेतृत्वाने दाखवली नाही. संघटना अडचणीत असतानाही जिल्ह्यात पक्षाने लक्ष घातलेलं नाही. राऊत केवळ कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात मात्र त्यांच्याकडे कोणतेही धोरण नाही, अशी टीका त्यांनी केलीय.

बालेकिल्ला राहिलाच कुठे?

कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण हे कधीकाळी समीकरण म्हटले जायचे. शिवसेना प्रमुखांच्या काळात तसे चित्रही कोकणात होते. पण आता शिवसेनेत फूट पडली असून दोन शिवसेना निर्माण झाल्या आहेत. ज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. यांच्याकडून आम्ही राजकारणाचे धडे घेतले आहेत. आत्ताच्या घडीला संपूर्ण कोकणात ठाकरेंच्या शिवसेनाचा एकमेव आमदार शिल्लक आहे. यामुळे कोकण उबाठाचा बालेकिल्ला राहिलाय कुठे? खोचक टोला देखील झगडे यांनी लगावला आहे. तर उबाठा पुन्हा कोकणात उभारी घेईल, असे वाटत नसल्यानेच येत्या 10 जून दरम्यान शिवसेनेत माझ्यासह इतर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

झगडे स्वार्थासाठी निघालेत?

दरम्यान झगडेंनी स्वार्थासाठी पक्ष सोडल्याचा दावा शिवसेना उबाठा कडून करण्यात आला आहे. तर शिवसेना चिपळूणमध्ये मजबूत स्थितीत आजही असून किती? कुणी? आणि कुठे गेले म्हणून संघटनेवर फारसा परिणाम होणार नाही. चिपळूणमध्ये अनेकदा त्याचा अनुभव आला आहे. कार्यकर्ता, पदाधिकारी संघटनेबरोबर आहे. यामुळे तालुकाप्रमुख राहिलेले विनोद झगडे यांच्याबरोबर फार कुणी नाही. ते स्वार्थासाठी अन्यत्र जात आहेत, असल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT