ladki bahin yojana Sarkarnama
महाराष्ट्र

ladki bahin yojana : लाभ मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींची नामी शक्कल : सर्व्हेला आलेल्या सेविकांना भन्नाट उत्तरे

Maharashtra government scheme for women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत सेविकांना काही लाभार्थी कुटुंबांकडून असे भन्नाट तोंडी उत्तरे मिळत आहेत की, सेविकांचाही गोंधळ उडतोय.

Rashmi Mane

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाने पाठविलेल्या 26 लाख अपात्र लाभार्थींची पडताळणी सध्या अंगणवाडी सेविकांकडून सुरू आहे. मात्र, या सर्व्हेदरम्यान लाभार्थ्यांकडून मिळणारी भन्नाट तोंडी उत्तरे अधिकाऱ्यांनाही बुचकळ्यात टाकत आहेत.

योजनेच्या निकषानुसार, पती-पत्नी आणि एक अविवाहित मुलगी एवढीच कुटुंबाची व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार विवाहित महिला व अविवाहित मुलगीच या योजनेसाठी पात्र आहेत. तरीदेखील अनेक कुटुंबांमध्ये दोन-तीन सुना, सासू आणि अविवाहित मुलगी अशा चार-पाच महिलांनी अर्ज करून लाभ घेतल्याची शेकडो उदाहरणे समोर आली आहेत.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील 16,078 महिलांचे वय योजनेच्या पात्रतेच्या निकषात बसत नाही. एवढेच नव्हे, तर एकाच कुटुंबातील दोन महिलाच पात्र असतानाही तिसऱ्या महिलांनी अर्ज केल्याचे 83,722 प्रकरणे शासनाच्या निदर्शनास आली असून त्यांची पडताळणी सुरू आहे. काही ठिकाणी 85,90 अगदी 98 वर्षांच्या आजीबाईंनी देखील लाभ घेतल्याचे आढळून आले आहे.

पडताळणीवेळी काही महिला सांगतात – “आमच्या रेशन कार्डावर मुलीचे नाव आहे, पण तिचा विवाह झालाय; सासरी तिचे नाव अजून समाविष्ट झाले नाही, त्यामुळे आम्ही अर्ज केला.” तर काही जणींचे म्हणणे, “दोन्ही सुना वेगळ्या राहतात; रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी दिले आहे, पण अजून विभक्त झाले नाही.”

केवळ तोंडी माहितीवर सुरू असलेल्या सर्व्हेमुळे शासनाकडील अपात्र लाभार्थ्यांची यादी नेमकी किती प्रमाणात योग्य ठरणार, याबाबत साशंकता आहे. या पडताळणीचा निकाल लागेपर्यंत अनेकांचे लाभ सुरू राहणार की बंद होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

SCROLL FOR NEXT