Bhausaheb Patil Chikatgaonkar And Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Potitics : माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिंदे यांच्या शिवसेनेत, वैजापूर मध्ये ताकद वाढणार!

Bhausaheb Patil Chikatgaonkar : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दगाबाजी केल्यामुळे संतप्त झालेल्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बोरणारे यांच्यासाठी जोर लावत त्यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : वैजापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तालुक्यात आपली ताकद आणखी वाढवण्यावर भर दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऐनवेळी भाजपमधून आयात केलेल्या दिनेशसिंह परदेशी यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश करून विधानसभेची तयारी करणाऱ्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या आशेवर पाणी फिरले होते.

दरम्यान उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असल्याने हा प्रयत्नही फसला. त्यामुळे भाऊसाहेब चिकटगावकर यांना विधानसभेची केलेली सगळी तयारी व कार्यकर्त्यांची शक्ती ऐनवेळी शिंदे यांचे उमेदवार तथा विद्यमान आमदार रमेश बोरणारे यांच्यासाठी वापरावी लागली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दगाबाजी केल्यामुळे संतप्त झालेल्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बोरणारे यांच्यासाठी जोर लावत त्यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना मानणारा वैजापूर तालुक्यात मोठा वर्ग आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 च्या मोदी लाटेत विजय मिळवलेले ते आमदार होते. दरम्यानच्या काळात 2019 मध्ये वैजापूर मधील उमेदवारीसाठी काका-पुतण्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. कौटुंबिक कलह नको म्हणून सामंजस्याची भूमिका घेत भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उमेदवारीवरील दावा सोडला आणि पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मात्र तेलही गेले आणि तूपही गेले अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था झाली.

अभय पाटील चिकटगावकर यांचा पराभव झाला आणि विद्यमान आमदार असणारी जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. अजित पवार आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आग्रह नडला, काकाऐवजी तरुण पुतण्या असलेल्या अभय पाटील चिकटगावकर या नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्याचा या दोन्ही नेत्यांचा निर्णय फसला आणि शिवसेनेच्या रमेश बोरणारे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता.

मात्र राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकल्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपमधून दिनेशसिंह परदेशी यांना पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली. आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याचा अंदाज येताच भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. मात्र हे सगळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडल्याने चिकटगावकर यांची मोठी अडचण झाली.

दुसऱ्या पक्षात जाण्याचा पर्यायही शिल्लक राहिला नाही. अशावेळी समर्थकांशी चर्चा करून चिकटगावकर यांनी दगाबाजी केलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षालाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि थेट शिंदे यांच्या रमेश बोरनारे यांना पाठिंबा दर्शवत त्यांचा प्रचार केला. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील ही जागा मोठ्या मताधिक्याने बोरणारे यांनी जिंकली. यामध्ये भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा मोठा वाटा होता.

विधानसभेला मदत केल्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुका पाहता भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासारख्या आणखी एक मराठा नेत्याला शिवसेनेत प्रवेश देत एकनाथ शिंदे यांनी वैजापूरमध्ये मोठी खेळी केली. दरम्यान चिकटगावकर यांना पक्षाने काय शब्द दिला? हे अद्याप स्पष्ट नसले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. चिकटगावकर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे वैजापूर तालुक्यात या पक्षाला आणखी बळ मिळणार एवढे मात्र निश्चित. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे तालुक्यातील अभ्यासू नेत्यांपैकी एक म्हणूनही ओळखले जातात. विशेषतः शेती, सिंचन आणि पाणी प्रश्नावर त्यांची कायम सडेतोड भूमिका राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT