Shivsena Politics : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी कोल्हापुरात अस्तित्व टिकवण्याची लढाई सुरू आहे. एकीकडे महायुतीमधील सर्वच पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील शिवसेनमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल आहे.
विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्याचा ठपका ठेवत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळण्याच्या अनुषंगाने पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी पक्षातीलच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची तक्रार मुंबईपर्यंत पोहोचवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत बदल व्हावेत, अशी मागणी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे उपनेते संजय पवार नेतृत्वावर शंका उपस्थित केली आहे. त्या संदर्भात नुकतीच त्यांनी खासदार अनिल देसाई यांची भेट घेऊन पक्षाची कैफियत मांडली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढल्याने पक्षातील अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी झाली होती. कोल्हापूर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिलेदरांकडून दावा करण्यात आला होता.
मात्र विधानसभा सदस्याच्या संख्येवरून कोल्हापूरची जागा काँग्रेसला तर हातकणंगलेची जागा शिवसेनेला गेली. कोल्हापूरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे घ्यावी अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीकडे केली होती. मात्र त्याला पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी दाद न दिल्याने ही जागा काँग्रेसला गेली असल्याची खंत शिवसैनिकांमध्ये आजही आहे.
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून देखील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये रस्सीखेच निर्माण झाली होती. शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी उत्तरच्या जागेसाठी आग्रह धरला होता. तर उत्तरच्या जागेसाठी शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी मेळावा घेत कोल्हापूर उत्तर च्या जागेवर दावा केला होता. मात्र मानपानावरून अंतर्गत खडाजंगी झाली आणि ती गोष्ट समाज माध्यमात व्हायरल झाली. पक्ष संघटन, शिवसैनिकांना सोबत न घेऊन गेल्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची वेध लागले आहेत. आगामी काळात कोणत्याही क्षणी कोल्हापूर इचलकरंजी महापालिका शिवाय जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती सभापतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर मागील दोन निवडणुकीतील अनुभव पाहता जिल्ह्यात नेतृत्वातच कमतरता असल्याची खंत पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या पदाधिकाऱ्याच्या मागे शिवसैनिक आहेत अशांना संधी मिळावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. सध्याचे चित्र पाहता ठाकरेंचे प्रमुख शिलेदार हे केवळ आंदोलनापुरतेच ओळखले जातात.
शिवसैनिकातीलच चेहरा मिळावा अशी मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे. शिवाय काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बदल व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आगामी काळात कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुका होण्याचे शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्ष संघटन आणि पक्ष विस्तारासाठी चांगले नेतृत्व आवश्यक आहे. अनेक वर्ष पदाधिकाऱ्यांकडे पद आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बदल महत्त्वाचे आहेत. संदर्भातच मी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष रविकरण इंगवले यांनी दिली. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.