ambadas danve chandrakant khaire sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve News : शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर दानवेंकडून स्पष्टीकरण, खैरेंवर साधला निशाणा

Akshay Sabale

छत्रपती संभाजीनगर : 16 मार्च | लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. 17 मार्चनंतर महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होऊ शकते. अशातच शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज ( Ambadas Danve ) असल्याचं बोललं जात आहे. त्यातून अंबादास दानवे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह दानवे हेसुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना ( Chandrakant Khaire ) उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दानवे शिंदे गटात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर दानवेंनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

"पक्षप्रमुखांकडे हट्ट करण्याचा अधिकार"

अंबादास दानवे म्हणाले, "मी नाराज असल्याच्या चर्चांना कोणताही अर्थ नाही. मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. निवडून येणं न येणं, याला प्राधान्य न देता संघटनेच्या विचारांना घेऊन कामं करणं आणि त्या विचारांवर चालणारा मी शिवसैनिक आहे. संघटनेच्या प्रमुखांकडे हट्ट करण्याचा मला अधिकार आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"लोकसभा लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केली"

"मी 10 वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. अजूनही कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. मी पक्षप्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यालयाचं उद्घाटन झालं, याची मला कल्पना नव्हती. हे उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलं आहे. एकांगीपणानं कुणी वागत असेल, तर याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे," असं म्हणत दानवेंनी ( Ambadas Danve ) अप्रत्यक्षपणे खैरेंवर निशाणा साधला.

"उद्धव ठाकरेंकडे पाहून पक्षाचं काम करतो"

"चंद्रकांत खैरे मला डावलण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. मी खैरेंकडे पाहून थोडीच पक्षाचं काम करतो. मी उद्धव ठाकरेंकडे पाहून पक्षाचं काम करत असतो. ते काय बोलतात याच्याशी देणंघेणं नाही," असं म्हणत खैरेंवर एकप्रकारे दानवेंनी आगपाखड केली.

"शिंदे गट राहणार नाही"

"मी शिंदे गटात जाणार नाही. शिंदे गट दोन-पाच महिन्यांसाठी आहे. नंतर शिंदे गट राहणार नाही," असं दानवेंनी सांगितलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT