Agriculture Department Action News : राज्याचे मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनवर यंदा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटे आली असून, शेतकऱ्यांकडून उगवण क्षमतेच्या शेकडो तक्रारी येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत कृषी विभागाकडे तीन हजार ६१५ तक्रारी आल्या असून, प्रयोगशाळांकडे पाठवलेले ५८१ नमुने अप्रमाणित निघाले आहेत. यामुळे ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या कृषी विभागाने आतापर्यंत बियाणे कंपन्यांवर चार ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात यंदा ४७ लाख हेक्टरहून अधिक सोयाबीनचा पेरा होण्याची अंदाज आहे. त्यापैकी १३ जुलैअखेर ३७ लाख ३६ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन उत्पादक शेतकरी एकूण बियाण्यांपैकी ७५ टक्के घरगुती बियाणे वापरतात. तसेच २० ते २५ टक्के बियाणे बाजारपेठांमधून घेऊन वापरले जाते. राज्यात बियाण्यांची विक्री करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना सत्यप्रत बियाण्यांची विक्री केली जाते.
प्रमाणित बियाण्यांप्रमाणे सत्यप्रत बियाणे शासनाच्या काटेकोर तपासणी प्रणालीत समाविष्ट नाही. खासगी कंपनी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाण्याच्या विक्री पिशवीवर ‘किमान ७० टक्के उगवण क्षमता असलेले सत्यप्रत्य बियाणे’ असे लेबल लावते. खासगी कंपन्यांच्या या लेबलच्या भरवश्यावर शेतकरी बियाणे विकत घेऊन पेरा करतो.
१८.५८ लाख क्विंटल खासगी बियाणे बाजारात
राज्यात ‘महाबीज’सह विविध खासगी कंपन्यांनी १८ लाख ५७ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे यंदा राज्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला आणले आहे. यापैकी आतापर्यंत किती विकले गेले, यातील नेमके निकृष्ट बियाणे किती याची माहिती नसल्याने कृषी विभागदेखील संभ्रमात आहे. त्यामुळे तक्रारी असलेल्या जिल्ह्यांवर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी लक्ष केंद्रित केले आहे.
सदोष बियाण्यामुळे उगवण न झाल्याच्या आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यात मुख्यत्वे अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातही पुन्हा सर्वाधिक तक्रारी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात दाखल झाल्या आहेत.
या कंपनीविरोधात १३ जुलैअखेर ११२९ तक्रारी आल्या असून, कृषी विभागाने अकोला व अमरावती व वर्धा अशा तीन जिल्ह्यांमध्ये कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रवी हायब्रीड सीड्स ॲण्ड रिसर्च कंपनीविरोधात ८७० तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. या कंपनीविरोधात देखील अकोला जिल्ह्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘महाबीज’, तसेच पार्श्व जेनेटिक्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारी येत असून क्षेत्रीय पातळीवर तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.