Nala Sopara News : विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. तावडे पाच कोटी रुपये घेऊन आल्याचा ठपका आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी ठेवला होता. त्यानंतर तावडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.
मागील चार-पाच तासांपासून विरारमधील हॉटेलमध्ये गोंधळ सुरू आहे. ठाकुरांच्या आरोपांनंतर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तावडेंनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना आपण इथे केवळ बैठकीसाठी आल्याचा दावा केला आहे. समोरच्या मित्रपक्षांचा मी पैसे वाटत असल्याचा समज झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तावडेंनी सांगितले की, नालासोपारा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आज बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत, व्होटिंग मशीनला सील कसे करावे, आक्षेप कसे घ्यायचे, ते समजावून सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की, मी पैसे वाटतोय.
मी म्हटले, सगळं चेक करा. क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर तेही इथे आले. पैसे वाटप होत असतील तर त्याची चौकशी करावी. निवडणूक आयोग, पोलिस सीसीटीव्ही हे सगळं आहे. मतदानाच्या दिवशी मत यंत्रणा जी असते, त्यावर सही कशी घ्यायची, आक्षेप कसा घ्यायचा हे त्या बैठकीत सांगत होतो. मी चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. निवडणूक आयोग, पोलिसांनी याची चौकशी करावी. जे वास्तव आहे ते सगळ्यांना माहिती आहे, असेही तावडेंनी स्पष्ट केले.
विनोद तावडे उपस्थित असलेल्या हॉटेलमध्ये अचानक बविआचे कार्यकर्ते घुसले. तिथे त्यांना काही पाकिटे सापडली. त्यामध्ये पैसे असल्याचे आढळून आल्यानंतर एकच गोंधळ उडाली.तावडेंकडून पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर भाजप आणि आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
हॉटेलमध्ये काही वेळाने आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यानंतर आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूरही दाखल झाले. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. आपल्याकडे तावडेंच्या डायऱ्या असून त्यात पैसे कसे वाटले, हे नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ती डायरीही दाखवली. हॉटेलमध्ये नोटांची बंडलही आढळून आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.