Nagpur News : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या नागपूरमधील रोड शोदरम्यान रविवारी राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर त्यांना रोड शो थांबवावा लागला. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या, पण महाविकास आघाडीच जिंकणार, असे म्हणत त्यांनी या कार्यकर्त्यांना डिवचले.
नागपुरात काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी रविवारी प्रियांका गांधी यांचा रोड शो झाला. मध्य नागपुरात हा रोड शो ठेवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या रोड शोला सुरूवात झाली होती. प्रियांका गांधींचा राज्यातील पहिलाच रोड शो असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह होता.
रोड शोचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बडकस चौकात होणार होता. त्यामुळे या रोड शोबाबत आधीपासूनच जोरदार चर्चा होती. काँग्रेसने या भागात रॅली ठेवत आधीच एकप्रकारे भाजपला डिवचले होते. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्य नाराजी होती. त्यामुळे या भागात भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन उभे होते.
प्रियांका गांधी यांचा रोड शो बडकस चौक परिसरात आल्यानंतर प्रियांका गांधी यांना एका इमारतीवर भाजपचे कार्यकर्ते झेंडे फडकावताना दिसले. सुरुवातीला त्यांनी या कार्यकर्त्यांना हात दाखवून नमस्कार केला. त्यानंतर हातात माईक घेत त्यांना निवडणुकीच्या शुभेच्या दिल्या. तसेच महाविकास आघाडीच जिंकणार, असे सांगत डिवचण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचा विजय असो, महाराष्ट्राचा विजय असो, असे नारेही त्यांनी दिले.
दरम्यान, प्रियांका गांधी यांचा रोड शो सुरु असताना या भागात भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दटके यांच्या बॅनरसोबत छेडछाड केल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर याचठिकाणी रोड शो थांबवून प्रियांका गांधी निघून गेल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.