Devendra Fadnavis, Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा फडणवीसांना शब्द; निवडणुकीनंतर त्यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार...

PM Modi Speech Dhule: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी धुळे येथून महाराष्ट्रातील प्रचाराला सुरूवात केली.

Rajanand More

PM Modi in Dhule: राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका शुक्रवारपासून सुरूवात झाला. धुळे येथील पहिल्याच सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक इच्छा पूर्ण करण्याचा शब्दही त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांनी ऑगस्ट महिन्यात पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचे भूमिपूजन केले होते. त्या कार्यक्रमातील एक आठवण सांगताना पंतप्रधान मोदींनी फडणवीसांची एक इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले. ते म्हणाले, वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी आलो असताना देवेंद्र फडणवीस यांनी पब्लिकमध्ये एक इच्छा व्यक्त केली होती.

फडणवीसांनी म्हटले होते, भारतात सर्वात मोठे बंदर बनत आहे. मोदीजी एवढे सारे करत आहात, हजारो कोटी खर्च करत आहात. आता इथे एक विमानतळ बनवा. त्यादिवशी मी गप्प राहिलो होतो. पण आचारसंहिता संपताच, महाराष्ट्रात महायुतीचा शपथविधी होताच मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून देवेंद्रजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करेन, असा शब्द मोदींनी धुळे येथील सभेत दिला. त्यानंतर फडणवीसांनीही टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. (Mahayuti)

महाविकास आघाडीवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींनी सभेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. देशभरात माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक होत आहे. तर इकडे महाविकास आघाडी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली. जनतेला लुटण्याचे काम आघाडी सरकारने केले. अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केला. अडीच वर्ष आघाडी सरकारने जनतेची लूट केल्याची टीका मोदींनी केली.

महाविकास आघाडीच्या गाडीला चाक नाही, ब्रेक नाही, ड्रायव्हर सीटवर बसण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु आहे, असा टोलाही मोदींनी लगावला. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राला महायुतीने महाराष्ट्राला जी गती मिळाली आहे ती थांबणार नाही, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT