Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मोठी बातमी : मनोज जरांगेंचा निवडणुकीचा फॉर्म्यूला ठरला; कुठे उमेदवार देणार, कुठे पाडणार?

Maharashtra Assembly Election Maratha Reservation : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आज मराठा बांधवांची बैठक घेतली.

Rajanand More

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचा फॉर्म्यूला ठरला असून त्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत कुठल्या मतदारसंघात उमेदवार पाडायचे आणि कुठल्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

असा आहे फॉर्म्यूला

जिथं निवडून येतील, तिथं उमेदवार उभे करावेत. एससी आणि एसटीसाठी आरक्षित जागांसाठी उमेदवार देऊ नयेत. जे आपल्या विचारांशी सहमत आहेत, त्यांना निवडून आणायचे. जिथं आपले निवडून येणार नाहीत, तिथे जो आपल्याला 500 रुपयांच्या बॉन्डवर लिहून देईल, की तुमच्या मागण्यांशी सहमत आहोत, त्यांनाच निवडून द्यायचे. नाहीतर सगळ्यांना पाडायचे, असे जरांगे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

माझी निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा नाही. पण मी समाजापुढे जाणार आहे. आपण राजकारणात राहूच नये, असे मला वाटते. जर आपण उभे करायचे ठरवले तर माझेही काही प्रश्न आहेत. माझ्या समाजाचा लढा हा या नादात बंद पडता कामा नये. कारण निवडणुकीत हार-जीत असते. जर यामुळे माझा समाज खचला तर अवघड होईल, अशी भीती मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

महायुती असो की महाविकास आघाडी हे सख्खे मावसभाऊ आहेत. इकडे उभा करा आणि पाडा म्हणणारे, हेही मावसभाऊ आहेत. आपण उमेदवार उभे केले तर भाजपवाले खूष होतील. आपण उभे केले नाहीत तर महाविकास आघाडीवाले खूष होतील. दोघे म्हणत नाहीत, आम्ही आरक्षण देतो, असे जरांगे म्हणाले.

आपल्यावर जळणारे खूप आहेत. आपल्या हाताने आपल्या संपवायचे नाही. त्यामुळे वेगळा मार्ग काढावा लागेल. महायुती आणि महाविकास आघाडीवाले आशा लावून बसले आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपले एक लाख मतदान आहे. जर ठरले तर दोघांचाही कार्यक्रम करायचा. पक्षाकडून किंवा नेत्याकडून बोलायचे बंद करा. समाज डोळ्यासमोर ठेवून बोला, असे जरांगे यांनी सांगितले.  

मी फक्त 30 ते 40 दिवस राजकारणात आहे. मला आणि माझ्या समाजाला उघडं पडू देऊ नका, माझा विश्वासघात होऊ देऊ नका, हे आश्वासन द्या. पाडा म्हणणारे आणि उभे करा म्हणणारेही माझ्यासाठी सारखेच. आंदोलन आणि मी उघडे पडले तर आपली जात संपेल, असे जरांगे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT