Uddhav-Aditya Thackeray With CM Fadnavis News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड! भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची ऑफर; महापालिकेवर एकत्र राज्य करणार?

Shivsena BJP Alliance News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यांना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या युतीच्या झंझावातामुळे मुंबई महापालिकेतील 25 वर्षांची सत्ता गमवावी लागली. राज ठाकरेंना सोबत घेऊनही उद्धव ठाकरे यांना मुंबईवरची आपली हुकुमत राखता आली नाही.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्यातील बहुचर्चित 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली. निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेनेनंही चांगली कामगिरी केली. त्यानंतर सत्तास्थापनेच्या खेळात अकोट,अंबरनाथ,परळी यांसह अनेक ठिकाणी अभद्र युतीचा प्रयत्न झाला, पण प्रचंड गदारोळानंतर तो फोल ठरला. याचदरम्यान,आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यांना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या युतीच्या झंझावातामुळे मुंबई महापालिकेतील 25 वर्षांची सत्ता गमवावी लागली. राज ठाकरेंना सोबत घेऊनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुंबईतील आपली हुकुमत राखता आली नाही. तरीही निकालानंतर ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होईल असा आशावादही जागवला होता. पण भाजपनं महायुतीचाच महापौर होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर राजकीय घडामोडी थांबल्या होत्या.

पण आता एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेनं थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असतानाच भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र,ही युती मुंबई महापालिकेसाठी नसून विदर्भातील अकोला महानगरपालिकेत असणार आहे. जर ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपची युतीची ऑफर स्विकारली,तर ही महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरची खळबळ उडवणारी सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरणार आहे.

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसह कोणत्याही पक्षाला जनतेचं स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. यामुळे आता भाजप थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच सोबत घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्याचमुळे भाजपनं अखेर आपल्या कधीकाळच्या राजकीय मित्राला आणि सध्याच्या प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेलाच युतीची ऑफर देत सत्तास्थापनेसाठी साद घातली आहे.

राज्यात हे भाजप व उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.पण राजकारणात नेहमीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं जात.त्याचमुळे आता अकोल्यात भाजप आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.

अकोला महानगरपालिकेत सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी 41 हा बहुमताचा आकडा गाठण्याची आवश्यकता आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अकोला महापालिकेत 38 जागा जिंकल्या. सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही.कारण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना 3 जागा कमी पडल्या.त्याचमुळे भाजपनं नवी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करताना ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

अकोला महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक यंदाच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी हे दोन्हीही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. कारण याबाबत आता अकोल्यात भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याचं समोर येत आहे.

भाजपकडून देण्यात आलेल्या युतीच्या ऑफरला उद्धव ठाकरेंचीही शिवसेनाही अनुकूल प्रतिसाद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पण आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून अकोला महानगरपालिकेत उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची दोन मोठ्या मागण्या करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

अकोला महापालिका

एकूण जागा : 80

भाजप : 38

काँग्रेस : 21

उद्धव ठाकरेंची शिवसेना: 06

एकनाथ शिंदे शिवसेना : 01

राष्ट्रवादी (अजित पवार) : 01

राष्ट्रवादी (शरद पवार): 03

वंचित : 05

अपक्ष : 02

एमआयएम : 03

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT