

Chandrapur Congress Politics : भिवंडी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेस सत्तेत बसणार हे निश्चित झालेले असतानाच चंद्रपूर महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आपल्याच पक्षातील नगरसेवकांची पळवापळवी केली आहे. 10 ते 20लाख रुपयांत नगरसेवकांना आपल्या गोटात ओढले, अशी चर्चा आहे. दरम्यान, संभाव्य फुट रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले असून, पक्षमान्यतेशिवाय कोणताही गट मान्य करू नये, असे स्पष्ट केले आहे.
आपल्या गोटातील नगरसेवकांना पर्यटनाला पाठविले आहे. तूर्तास काँग्रेसकडे मित्रपक्षांसह 30 नगरसेवकांचा अधिकृत पाठींबा आहे. मात्र, हे नगरसेवक वडेट्टीवार आणि धानोरकर गटात विभागले गेले आहेत. दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत. धानोरकरांचा लोकसभा मतदारसंघ असल्याने वडेट्टीवारांनी ढवळाढवळ करू नये, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तर वडेट्टीवार राज्याचे नेते आहेत, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
परिणामी, सत्ता जवळ असताना पक्षात फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यांच्यासाठी प्रचार केला आणि उमेदवारी दिली. त्याच निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या खेम्यात दाखल करण्यासाठी दहा-वीस लाख रुपये देण्याची नामुष्की या नेत्यांवर आली आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत दबावाला बळी पडायचे नाही, असा निर्धार एका गटाने केला आहे. त्यांनी स्वतंत्र गट नोंदणीची तयारी पूर्ण केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत राज्यभरात पक्षाला अपवाद वगळता अपयश आले आहे. ज्या चंद्रपूर महानगरपालिकेत मतदारांनी सत्तेच्या जवळ पोहोचले, तिथेही नेत्यांच्या भांडणामुळे घात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पक्षांच्या मान्यतेशिवाय कोणताही गट अधिकृत समजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, गट स्थापन करताना पक्षांची मान्यता लागते का, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, दोन्ही गटात तडजोडी व्हाव्यात, यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत.
कायद्यानुसार महानगरपालिकेत गट तयार करण्यासाठी ‘महाराष्ट्र स्थानिक संस्था सदस्य (अयोग्यतेबाबत) कायदा, 1986 आणि नियम, 1987’ लागू आहेत. गट नोंदणीसाठी सदस्यांची बैठक, गट स्थापनाचा ठराव, गट नेत्याची निवड, नमुना-1 व नमुना-3 प्रतिज्ञापत्रे आणि विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पक्षाची लेखी मान्यता कायद्याने अनिवार्य नाही. पण व्यवहारात काही परिस्थितीत ती महत्त्वाची ठरते.
अधिकृत पक्षगट तयार करताना पक्षाच्या नावाने नोंदणी आणि व्हिप आदेश आवश्यक असल्यास मान्यता आवश्यक आहे. पक्षाच्या इच्छेविरुद्ध गट तयार केल्यास अपात्रतेचा धोका निर्माण होतो. वेगवेगळ्या पक्षांचे सदस्य मिळून आघाडी किंवा मिश्र गट तयार करू शकतात. त्यासाठी कायद्याने मान्यता अनिवार्य नसते.
भाजपचे काही नगरसेवक आपल्या संपकार्त असल्याचा दावा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. आधी आपल्याच नगरसेवकांना सांभाळून ठेवा, असा सल्ला आमदार जोरगेवारांनी वडेट्टीवारांना दिला. आमच्या नगरसेवकांचे मोबाईल सुरू आहेत. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे. त्यांचे स्वतःचेच नगरसेवक त्यांना सांभाळत नाहीत. ते काय आमचे पळविणार? असा टोला जोरगेवारांनी वडेट्टीवारांना हाणला.
महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी लोहारा परिसरातील जलसा हॉटेल येथे मंगळवारी (ता.21) चिंतन बैठक घेतली. एबीफार्म घोटाळ्यानंतर अनेक भाजपचे बंडखोर रिंगणात उतरले. त्याचा फटका भाजपच्या अधिकृत उमेदवाराला बसला. गतवेळी 36 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले. बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न कोणत्याही नेत्यांनी केला नाही.
त्यांच्या दुर्लक्षामुळे आमचा बळी गेला, असा एकमुखी सूर उपस्थित पराभूत उमेदवारांचा होता. या बैठकीला माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, छबू वैरागडे, संदीप आवारी, रवी जोगी, प्रमोद क्षीरसागर, रवी आसवानी, बंटी चौधरी, अक्षय शेंडे यांच्यासह जवळपास 33 जण उपस्थित होते. यापुढे पक्षाचे निष्ठेने काम करणार, असा निर्धार त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.