Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजना, राज्यातील 50 लाख बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासोबतच काही महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातच अर्थसंकल्पात कर्जमाफीविषयी केलेल्या घोषणेबाबत विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जात असतानाच सीएम देवेंद्र फडणवीसांनी हा विषय एका वाक्यात संपवला. कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे बँकांना नाही, असे सांगत त्यांनी दोन लाखापर्यंतचे कुठल्याही बँकांचे पीक कर्ज माफ करणार असून त्याबाबत समितीकडून आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नाला उत्तरे दिली. राज्यातील शेतकऱ्यांना ३० जुनपर्यंत कर्ज माफी करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सरकारी व निमसरकारी बँकाकडे असलेले शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाणार आहे. त्यासाठी सर्वच बँकांकडून देण्यात आलेले दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून जाचक अटी नसल्याचे सीएम फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
केवळ राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होईल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मोठे भाष्य केले आहे. कर्जमाफीची मी घोषणा केली आहे. त्याबद्दल कोणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोकं वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कोणी म्हणतंय की राष्ट्रीयकृत बँकेची होणार, कोणी म्हणतं की जिल्हा बँकेची होणार नाही. या सोसायटीची होणार नाही.कोणी म्हणतं त्या बँकेची होणार नाही. आम्ही दोन लाखांपर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले पीक कर्ज हे आम्ही माफ करणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही जाचक अटी व निकष लावण्यात येणार नाहीत. कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे, बँकांना नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी जाचक निकष लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करीत आतापर्यंत करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीमध्ये सर्वात मोठी ही माफी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 50 हजार रुपयांपर्यत लाभ
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखा रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जाहीर केला. पीक कर्ज थकलेल्या अशा पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली. 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. तर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 50 हजार रुपयांपर्यत लाभ मिळणार आहे. त्यांचे अतिरिक्त 50 हजारांचे कर्जही माफ होईल. पण ते नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी असायला हवेत.
केंद्र सरकार परिस्थिती हाताळतय : मुख्यमंत्री
अमेरिका-इराण युद्धानंतर उद्भवणारी परिस्थिती केंद्र सरकार हाताळत आहे. त्याबाबतच्या उपाययोजना केंद्र सरकारकडून केल्या जात असल्याचे फडणवीस यांनी एका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यामुळे आखाती युद्धाच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसणार नसल्याचे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.