Maharashtra Teachers Census Duty Sarkarnama
महाराष्ट्र

Census 2027: शिक्षकांना पुन्हा घरोघरी जावे लागणार! नववर्षात जनगणनेची 34 दिवस ड्युटी

Maharashtra Teachers Census Duty: महाराष्ट्रातील शिक्षकांना नववर्षात ३४ दिवस जनगणनेची ड्युटी करावी लागणार असून, २५ जानेवारीपासून घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जाणार आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Census 2027: नवीन वर्षाची सुरुवात होताच राज्यातील शिक्षकांवर जनगणनेच्या कामाची अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. आगामी जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना सलग ३४ दिवस घरोघरी जाऊन माहिती संकलित करावी लागणार आहे. २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत हे काम चालणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कामकाज सांभाळतानाच शिक्षकांना आता जनगणनेची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या कामासाठी राज्यातील खासगी माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच महापालिकांच्या शिक्षण मंडळातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नववर्षात शिक्षकांना तब्बल ३४ दिवस जनगणनेची ड्युटी करावी लागणार असल्याने शिक्षण क्षेत्रात या कामाची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची माहिती मागवली

जनगणनेच्या कामासाठी कोणत्या शिक्षकांची नियुक्ती करायची, याची प्राथमिक तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षकांची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये शिक्षकाचे नाव, पदनाम, मोबाइल क्रमांक, ई-मेल, लिंग, वय, पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांक यांचा समावेश आहे. तसेच संबंधित शिक्षक कार्यरत असलेल्या कार्यालयाचे किंवा शाळेचे नाव आणि पत्ता अशी माहितीही मागविण्यात आली आहे.

डिसेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. २१ डिसेंबरपासून १० जानेवारीपर्यंत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. जनगणनेचे काम राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे काम असल्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना त्याची प्रक्रिया आणि माहिती संकलनाची पद्धत समजावून सांगितली जाणार आहे.

घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची माहिती घेणार

दुसऱ्या टप्प्यात प्रगणकांना प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट द्यावी लागणार आहे. संबंधित कुटुंबात किती सदस्य राहतात, यासह आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम त्यांच्यावर असेल. प्रत्येक घरातील सदस्यांची अचूक माहिती नोंदवणे महत्त्वाचे असल्याने हे काम काळजीपूर्वक करावे लागणार आहे.

फेरतपासणी होणार

जनगणनेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षकांच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात संबंधित कर्मचाऱ्यांची फेरतपासणी होणार असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT