Maharashtra Educational Material Kit Yojana 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Construction Workers Education Kit: सरकारचा मोठा निर्णय! बांधकाम कामगारांच्या मुलांना 22 वस्तू मिळणार; कुणाला मिळणार लाभ?

Maharashtra Educational Material Kit Yojana 2026:महाराष्ट्रातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या पहिल्या दोन पाल्यांना राज्य सरकारच्या मूलभूत वस्तू संच सहाय्य योजनेंतर्गत 22 प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार आहे.

Mangesh Mahale

Pune News: शालेय साहित्य खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आता 22 प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी होणाऱ्या खर्चात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या योजनेला राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली असून, कामगार विभागाने यासंदर्भातील नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. 'मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना' या नावाने ही योजना राबवली जाणार आहे. यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यताही देण्यात आली आहे.

शैक्षणिक संचामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू मिळणार?

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संचामध्ये अभ्यास, लेखन, चित्रकला आणि दैनंदिन शालेय वापरासाठी आवश्यक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पाण्याची बाटली, गरम आणि थंड पाण्यासाठी थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षेसाठी पॅड, 18 लॉंग बुक, 8 ड्रॉइंग बुक, बॉलपेन बॉक्स, दोन पेन्सिल बॉक्स आणि भूमितीचा कंपास या वस्तू मिळतील.

याशिवाय दोन ऑईल पेस्टल्स, पोस्टर कलर, ब्रश संच, दोन प्लास्टिक पट्ट्या, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, दोन मार्करसह व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग यांचाही समावेश आहे. अशा एकूण 22 प्रकारच्या वस्तूंचे मिळून 49 नग विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ?

या योजनेसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेला कामगार सक्रिय (जिवंत) असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या पहिल्या दोन पाल्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. संबंधित विद्यार्थी इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे केवळ बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे पुरेसे नसून, शासन निर्णयातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

उपकर निधीतून होणार योजनेचा खर्च

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी मंडळाकडे जमा असलेल्या उपकर निधीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

या शैक्षणिक साहित्य संचाचा प्रस्ताव वस्तू निवड समितीच्या अभ्यासानंतर तयार करण्यात आला होता. 11 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता राज्य शासनानेही योजनेला हिरवा कंदील दिला आहे.

अधिकृत माहिती आणि शासन निर्णयासाठी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्या : [https://mahabocw.in/](https://mahabocw.in/)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT