Maharashtra drought situation: ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे राज्यातील अनेक भागांत तीव्र दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. एक ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान २० जिल्ह्यांतील ९१ तालुक्यांत दीर्घकालीन पर्जन्यखंड नोंदवला गेला. ऐन पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप पिके करपली असून, जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शासकीय आकडेवारीनुसार, राज्यातील २६ तालुक्यांमध्ये पावसाचा सलग २५ दिवसांपेक्षा अधिक, तर २७ तालुक्यांमध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आहे. यात सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक १३ तालुक्यांसह या विभागातील ३१ तालुक्यांचा समावेश आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील २२ , विदर्भातील २२ आणि मराठवाड्यातील १६ तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
एक जून ते २२ सप्टेंबरदरम्यान राज्यात एकूण ८४.४२ टक्के पाऊस नोंदविला गेला असला तरी पर्जन्यमानातील असमतोलामुळे ही बिकट अवस्था झाली आहे. जमिनीतील ओलावा सुकल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जुलैतील अतिवृष्टीने आधीच २, ७६, २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान केले होते, त्यात आता ऑगस्ट-सप्टेंबरच्या कोरड्या हवामानामुळे उर्वरित पिकांची धूळधाण झाली. विहिरी, कूपनलिकांच्या पातळीत घट झाल्याने ४७९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात एकही टँकर लावण्याची वेळ आली नव्हती. मात्र यंदा टँकरसंख्या पाहता, दुष्काळाच्या झळा किती तीव्र झाल्या आहेत, हे यावरून दिसून येते.
राज्यातील सप्टेंबरअखेरच्या पावसाच्या अहवालानुसार, एक जून ते २२ सप्टेंबर या कालावधीत राज्यात एकूण ७०६.२ मि.मी. पर्जन्यमान झाले असून ते सरासरीच्या ८४.२ टक्के आहे. एकूण ६४ पर्जन्य दिवस नोंदवले गेले आहेत. तालुकावार वर्गीकरणानुसार, कोणत्याही तालुक्यात सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेला नाही.
नागपूर विभागात सर्वांत कमी पाऊस महसूल विभागनिहाय पावसाच्या नोंदीनुसार, राज्यात कोकण विभागात सर्वाधिक २४२०.३ मि.मी. (सरासरीपेक्षा ९६.१४ टक्केपेक्षा अधिक) पाऊस पडला आहे, तर नागपूर विभागात सर्वात कमी ६५२ मि.मी. (७१.७४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले 'राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मी स्वतः विविध भागांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत असून, मराठवाड्यातील चित्र अधिक विदारक आहे. पिके करपल्याने बळिराजा मोठ्या संकटात आहे. शेतीचे तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ युद्धपातळीवर काम करत आहे.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.