

Mumbai News: महाराष्ट्रात यंदा पावसाने दडी मारल्यानं अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसानं पाठ फिरवल्यानं त्याचा थेट परिणाम खरीप पिकांवर झाला असून शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाई,पीक नुकसानीसह आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्यानं सरकारकडे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेही अखेर मैदानात उतरले असून लवकरच ते महाराष्ट्राचा लवकर दौरा करणार आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवारांचा 28 सप्टेंबरपासून राज्यात दुष्काळ परिस्थिती पाहणी दौरा सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये ही मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही या पत्रात पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
आता शरद पवार हे राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहेत. 28 सप्टेंबरपासून शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्याला सुरुवात होणार आहे.राज्यातील 36 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची तूट नोंदवण्यात आली माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या 16 सप्टेंबरच्या बैठकीत समोर आली होती.
राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे माहिती समोर येत आहे. राज्यातील 86 तालुक्यांमध्ये पावसाचा खंड 30 दिवसांपेक्षा अधिक राहिल्याची माहिती आहे.
राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णयाची प्रक्रिया होणार आहे. या समितीत महसूल, कृषी, जलसंपदा आणि हवामान विभागासह संबंधित यंत्रणांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया पुढे जाण्यास मदत होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालेला नसला तरी दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. प्रशासनाकडून पावसाची तूट,पीकस्थिती,पाणीसाठा आणि इतर तांत्रिक निकषांचा आढावा घेतला जात असून, त्यानंतरच दुष्काळाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनीही महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास विलंब का करत आहे,अशी टीकेची तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याने 130 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तीन आठवडे उलटले असताना, राज्य सरकार मात्र 5 ऑक्टोबरच्या घोषणेची वाट पाहत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
दुष्काळ जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पंचनामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही मराठवाड्यात दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि सरकारच्या या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवत असल्याचे दानवे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.